माता, बालमृत्यू रोखण्यासाठी ‘लक्ष्य मान्यता’

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यात या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या उपक्रमामुळे प्रसूती सेवेचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

pregnancy checkup
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

राज्यातील माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि खासगी रुग्णालयातील प्रसूती सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘लक्ष्य मान्यता’ उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमातून प्रसूती सेवेचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनोकॉलोजिकल सोसायटी ऑफ इंडिया (फॉग्सी) यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्य मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा शुभारंभ नुकताच पुण्यातील औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री शिंदे म्हणाले, “राज्यातील महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी तसंच खाजगी संस्थांमध्ये सेवांचा दर्जा सुधारून प्रसूतीदरम्यान होणाऱ्या माता मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष्य मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रसूतीदरम्यान आणि प्रसूती पश्चात गुणात्मक सेवा उपलब्ध करून माता आणि नवजात बालकांचे होणारे मृत्यू कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे”

“लक्ष्य मान्यता दर्जात्मक सेवा मानांकनाचा अवलंब करण्यासाठी नोंदणीकृत रूग्णालयांना दर्जात्मक सेवेच्या 26 मानाकांवर आधारित रूग्ण काळजी, सुरक्षितता, गुणवत्ता आणि सुविधा सुधारणे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खाजगी प्रसूती रुग्णालयांमध्ये गुणवत्ता मानकांना चालना देण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असून या उपक्रमामुळे माता आणि बालकांना गुणात्मक सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल”, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान, आरोग्यमंत्र्याच्या हस्ते या उपक्रमाच्या बोध चिन्हाचं आणि संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter