ढेकर येणं… चांगलं की चिंतेचं कारण?

साधी ढेकर ही आपण खाल्लेल्या पदार्थांचं नीट पचन झाल्याचं लक्षण आहे, तर आंबट ढेकर ही अपचनाचं लक्षण आहे. वारंवार ढेकर येणं हे एखाद्या समस्येचं किंवा आजाराचं लक्षण असू शकतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

‘अहाsss ढेकर आली… पोट भरलं वाटतं…’ जेवणानंतर लगेच कुणी ढेकर दिली की त्याचं पोट भरलं असं मानलं जातं. ढेकर म्हणजे पोटातील हवा बाहेर येण्याची प्रक्रिया. जेव्हा आपण काही खातो किंवा पितो, तेव्हा तोंडावाटे काही प्रमाणातह हवा आपल्या पोटात जाते आणि ही हवा तोंडावाटे पुन्हा बाहेर फेकली जाते आणि त्याला ढेकर असं म्हटलं जातं.

जेवणानंतर ढेकर आली की आपलं पोट थोडं हलकं झाल्यासारखं वाटतं, एकप्रकारे समाधान मिळतं, मात्र अनेकदा आपल्याला आंबट ढेकरदेखील येते, ज्यामुळे आपल्याला त्रास होतो. अशा दोन्ही प्रकारच्या ढेकरबाबत आपण जाणून घेऊयात.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना जनरल फिजिशिअन डॉ. प्रज्वलित सोनकांबळे यांनी सांगितलं की, “ढेकर 2 प्रकारच्या असतात एक आंबट आणि एक साधी. जेव्हा आपण खाल्लेलं अन्न अन्ननलिकेमार्फत पोटात सरकतं तेव्हा तिथे असलेली हवा बाहेर पडते. जेवणानंतर लगेच ढेकर येणं ही पोट भरल्याची लक्षणं आहेत, अशी ढेकर शक्यतो 2 तासांत येते. तर आंबट ढेकर हे अपचनाचं लक्षण आहे. 2 तासांनंतर अन्नपचनाची सुरुवात झालेली असते, अशावेळी अन्न नीट पचलं नाही तर आंबट ढेकर येते”

तर जनरल फिजिशिअन डॉ. संजय तळगावकर यांनी सांगितलं, “आपल्या पोटात अन्न गेल्यानंतर चयापचय प्रक्रियेत काही घटक तयार होतात, त्यावेळी हवादेखील तयार होते आणि ही हवा तोंडावाटे बाहेर फेकली जाते. पचनानंतर आलेली ढेकर शुद्ध असते, त्यात आंबटपणा नसतो. जर अन्न नीट पचलं नाही, तर आंबट ढेकर येते, त्यात करपटपणा असतो, यावेळी छातीत जळजळ जाणवते”

आपल्या काही सवयीदेखील ढेकर येण्यास कारणीभूत ठरतात.

 • भरभर खाणे
 • च्युइंगम चघळणे
 • धूम्रपान
 • सोडायुक्त पेयांचं सेवन

अनेकांना भरपूर वेळ ढेकर येतात. मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जास्त ढेकर येणं ही एखादी समस्यादेखील असू शकते.

डॉ. संजय तळगावकर म्हणाले, भरपूर ढेकर येणं म्हणजे पोटाला तडस लागणं असं म्हणतात. पोटात जडपणा जाणवतो. अन्नपचनासाठी आवश्यक असणारं पित्त पित्ताशयात साठवलं जातं. पित्ताशयात खडे होणे, सूज येणे अशी समस्या उद्भवल्यास अनेकदा पित्ताशय काढलं जातं. अशा रुग्णांना सातत्याने ढेकर येण्याची समस्या उद्भवते कारण त्यांचं अन्न नीट पचत नाही, त्यामुळे अशा रुग्णांनी जास्त तेलकट खाऊ नये. पित्ताशयाची समस्या, आतड्यांचं कार्य नीट होत असेल, तर जास्त ढेकर येऊ शकतात.

वारंवार ढेकर येणं एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं

 • अॅसिड रिफ्लेक्स किंवा गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लेक्स डिसिज
 • अपचन
 • गॅसट्रायटिस
 • हेलिकोबॅक्टर पायलोरी
 • इरिटेल बाऊल सिंड्रोम

एकदा, दोनदा ढेकर आली तर ठिक मात्र वारंवार ढेकर आल्यावर आपल्यालाही त्रास होतो, शिवाय आपण कोणासोबत असतो, तेव्हा सतत ढेकर देणं आपल्यालाही बरं वाटत नाही. त्यामुळे ढेकर कशी थांबेल यासाठी आपण प्रयत्न करतो.

ढेकर कशी थांबवावी?

 • काही खाताना सावकाश खा
 • सोडा आणि बिअर पिऊ नका
 • च्युइंगम चघळू नका
 • धूम्रपान थांबवा
 • जेवणानंतर थोडं झाला जेणेकरून तुमचं पचन होईल

तुमच्या सवयींमध्ये थोडेफार बदल केल्यास ढेकरचं प्रमाण कमी होईल. मात्र तरीदेखील डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter