…म्हणून वयाच्या पहिल्याच वर्षापासून मुलांना मासे द्या

वयाच्या पहिल्या वर्षापासूनच मुलांना मासे खायला दिल्यास त्यांच्यामधील अस्थमा आणि इतर श्वसनसंबंधी समस्या कमी होत असल्याचं एका अभ्यासात दिसून आलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पहिल्या 6 महिन्यांपर्यंत तर बाळ पूर्णपणे आईच्या दुधावरच असतं. मात्र 6 महिन्यांनंतर त्यांना पूरक आहार दिला जातो. मूल जेव्हा हळूहळू इतर पदार्थ खायला लागतात तेव्हा त्यांना काय द्यावं काय देऊ नये, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात असतात. त्यापैकीच एक म्हणजे लहान मुलांना मांसाहार किंवा मासे खायला द्यावेत की नाही? आणि कधीपासून?

तुमच्या मुलाला वयाच्या पहिल्या वर्षापासूनच मासे खायची सवय लावा. जेणेकरून त्यांना अस्थमा आणि इतर श्वसनसंबंधी समस्या बळावणार नाहीत.

नॉर्वेजिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या NTNU संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कमी वयातच मुलांना मासे दिल्यास त्यांच्यामध्ये अस्थमा आणि श्वसनसंबंधी समस्यांचं प्रमाण कमी होतं.

संशोधकांनी पिडियाट्रिक अलर्जी सर्व्हेत नोंद असलेल्या 4 हजारांपेक्षा जास्त कुटुंबाच्या माहितीचं निरीक्षण केलं. संशोधकांनी मासे खाणाऱ्या माता आणि मुलांचा अभ्यास केला. मुलांमधील अस्थमा आणि इतर श्वसनसंबंधी समस्यांचं निरीक्षण केलं.

जी मुलं कमी वयातच मासे खात होती, त्यांच्यामध्ये अस्थमा आणि श्वसनसंबंधी समस्यांचं प्रमाण 28 ते 40 टक्के कमी असल्याचं दिसून आलं.

संशोधनाच्या अभ्यासिका तोर्बजोर्न ओई म्हणाल्या, “आम्ही जी मुलं 2 वर्षांची होईपर्यंत आठवड्यातून किमान एकदा मासे खात होत होती, त्यांची कमी प्रमाणात मासे खाणाऱ्या मुलांशी तुलना केली. वयाच्या एका वर्षापासून मासे खाणाऱ्या मुलांना वयाच्या सहाव्या वर्षी अस्थमा आणि श्वसनसंबंधी समस्यांचा धोका कमी होत असल्याचं आम्हाला दिसलं. आईनं गरोदरपणात आणि स्तनपानाच्या काळात माशांचं सेवन करणं किंवा मुलांना वयाच्या दुसऱ्या वर्षापासून मासे देणं याचा आम्हाला फारसा परिणाम दिसून आला नाही”

माय मेडिकल मंत्राशी बोलताना न्यूट्रिशिअन्स प्राजक्ता बोरसे म्हणाल्या, “माशांमध्ये ओमेगा-3-6-9 हे घटक असतात. हे घटक फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवतात, श्वासोच्छवास आणि रक्तप्रवाह याला उत्तेजना मिळते. मुलांच्या विकासावेळी ओमेगा-3-6-9 हे प्रोस्टाग्लॅनडिन (Prostaglandin) आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची निर्मिती वाढवतं. त्यावेळी मुलांचं फुफ्फुस आणि इतर वेगवेगळ्या अवयवांची कार्यक्षमताही वाढीस लागते”

“मात्र तुम्ही शाकाहारी असाल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हे घटक मिळणार नाहीत. तर बदाम, अक्रोड, पालक, दालचिनी यांसारख्या पदार्थांमध्ये असे घटक मिळतात, जे तुम्हाला अस्थमापासून आराम देण्यात मदत करतात”

मुंबईतील जनरल फिजिशिअन डॉ. सचिन धूळप यांनी सांगितलं, घरात जर मांसाहार करत असतील तर लहान मुलांना मासे देण्यास हरकत नाही. मुलं सर्वकाही खात असतील तर त्यांना मासे देणं त्यांच्या आरोग्यासाठी चांगलंच असतं. मात्र मूल दुधाचं जास्त सेवन करत असेल तर शक्यतो त्याला मासे देऊ नये.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here