हिवाळ्यात दही खाल्ल्याने आपण आजारी पडतो?

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ए दही खाऊ नकोस… थंडी आहे, सर्दी-खोकला होईल तुला…हिवाळ्यात दही खायला गेलो की आपली आई आपल्याला ओरडते… दह्यात चांगले बॅक्टेरिया, व्हिटॅमिन्स, प्रोटिन, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, पोटॅशिअम असतं. आरोग्यासाठी चांगलं मानलं जाणारं असं दही थंडीत खाल्ल्याने खरंच आजारी पडतो का? हे खरं आहे? यामागे नेमकं कारण काय आहे, हे माय मेडिकल मंत्राने काही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं आहे.

हिवाळ्यात दह्याचं सेवन केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होत नाहीत. मात्र दह्याचं सेवन करताना काळजी घ्यायला हवी. थंड आणि आंबट दही खाऊ नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना मुंबईच्या सायन आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉ. नितीन कामत म्हणाले,“खरं तर ग्रीष्म, वसंत, शरद ऋतूत दही खाऊ नये. हिवाळ्यात दही खाण्यास हरकत नाही. दही त्वचेसाठी थंड असलं, तरी पोटात गेल्यावर ते उष्ण असतं. त्यामुळे थंडीत दह्याचं सेवन करायला हवं”

“मात्र हिवाळ्यात दह्याचं सेवन करायचं असल्यास शक्यतो आंबट आणि थंड दह्याचं सेवन टाळावं. यामुळे घशात बॅक्टेरिया वाढून घशाच्या समस्या उद्भवू शकतात. थंडीमध्ये दही खायचं झाल्यास गोड आणि सामान्य तापमान असलेलं असं दही खावं. तसंच रात्रीच्या वेळी दह्याचं सेवन कधीच करू नये.”, असा सल्लाही डॉ. नितीन कामत यांनी दिला आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter