#MentalHealthAwareness – “खचू नका…लढा…मात करा”

भारतीय सेवेतील महसूल अधिकारी शुभ्रता प्रकाश यांनीही मानसिक आजाराचा सामना केला. वयाच्या 36 व्या वर्षी त्या डिप्रेशनने ग्रस्त होत्या. शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजारावरही मात करणं शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिलं आणि आज हाच संदेश त्या इतरांना देतात. शुभ्रता यांनी आपला मानसिक आजाराशी लढ्याचा प्रवास ब्लॉग आणि पुस्तकाच्या माध्यमातून मांडला. शिवाय मानसिक आजार आणि त्याबाबतच्या गैरसमजुती यांच्याशी लढा कसा द्यायचा याबाबत त्या सातत्याने मार्गदर्शन करतात. माय मेडिकल मंत्रानं शुभ्रता यांची घेतलेली ही मुलाखत

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मानसिक आजार म्हटलं की त्या रुग्णाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. शारीरिक आजारांना जितक्या गांभीर्यानं घेतलं जातं, तितकं मानसिक आजाराला नाही. ज्याप्रमाणे शारीरिक आजाराच्या वेदना लोकांना दिसून येतात, तशा मानसिक आजारामुळे होणाऱ्या वेदनाही लोकांना दाखवून देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे व्यक्त होणं.

भारतीय सेवेतील महसूल अधिकारी शुभ्रता प्रकाश यांनीही मानसिक आजाराचा सामना केला. वयाच्या 36 व्या वर्षी त्या डिप्रेशनने ग्रस्त होत्या. प्रबळ इच्छाशक्तीने त्यांनी त्यावर मात केली, व्यक्त होण्यासाठी ब्लॉगचा आधार घेतला. त्यांचा हा ब्लॉग फक्त त्यांच्या मानसिक आजाराच्या लढ्याच्या प्रवासापुरता मर्यादित नाही, तर मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्यांसाठी मार्गदर्शक आहे. मानसिक आजार, त्याबाबतच्या गैरसमजुती आणि उपचार माहिती त्या या ब्लॉगच्या माध्यमातून देतात. डि वर्ड – अ सर्व्हावर्स गाइड टू डिप्रेशन हे पुस्तकही त्यांनी लिहिलं.

यानिमित्ताने माय मेडिकल मंत्राने शुभ्रता प्रकाश यांची घेतलेली ही छोटीशी मुलाखत.

जेव्हा तुम्ही डिप्रेशनशी लढा देत होता, त्यावेळी तुमच्यासाठी सर्वात अवघड क्षण कोणता होता?

2014 ते 2016 ही वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली. त्या दिवसांमध्ये मी बेडवरूनदेखील हलू शकत नव्हतं. अगदी खाणंपिणंदेखील मला बेडवरच दिलं जायचं, त्यापेक्षा दुसरं काहीच त्रासदायक नसू शकतं. त्यावेळी मी स्वत:ला पूर्णपणे गमावलं होतं, पूर्णत: खचले होते मी, आशाच सोडली होती.

तुम्ही या निराशेतून आशेचा मार्ग कशा शोधला, स्वत:ला सावरून नव्या उमेदीनं पुन्हा कशा उभ्या राहिल्या?

माझ्यासाठी माझा पती भक्कम असा आधार होता. मला दोन लहान मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी मला जगायचं होतं. आजचा एक दिवस वाईट असेल, मात्र उद्याचा दिवस चांगला असेल या आशा मी स्वत:मध्ये जागवली. पतीचा आधार आणि मुलांसोबत जगण्याची इच्छा यामुळे मी पुन्हा उभे राहिले.

मानसिक आजारावर मात करण्यासाठी ब्लॉगिंग तुम्हाला कितपत फायदा झाला?

शाळा, महाविद्यालयात असताना मी लिखाण करायचे. ब्लॉगिंगच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे मी ब्लॉग लिहिणं सुरू केलं. मला पूर्णपणे मानसिकरित्या व्यक्त होण्याचं समाधान मिळालं असं मी नाही म्हणणार, मात्र उपचारात मला त्याची निश्चितच मदत झाली. डिप्रेशनशी झुंजताना मला जे अनुभव आले, ते मी ब्लॉगवर. मी अजूनही ब्लॉग लिहिते कारण मी जरी मानसिक आजारातून बाहेर आले असले, तरी असे अनेक लोकं आहेत, जे मानसिक आजाराशी झुंजत आहेत, त्यांनी जर माझा ब्लॉग वाचला तर त्यांना मदत होईल, या भावनेतून मी माझं ब्लॉगवर लिखाण सुरू ठेवलं आहे.

मानसिक आजाराबाबत सध्या परिस्थिती बदललेली वाटते आहे का? की याबाबत अधिक जनजागृतीची गरज आहे, असं तुम्हाला वाटतं?

जर १० वर्षांपूर्वीची परिस्थिती आपण पाहिली, तर त्यामानाने आता मानसिक आजाराबाबत थोड्याफार प्रमाणात जनजागृती झाली आहे, मात्र हव्या तितक्या प्रमाणात नाही. मानसिक आजार हा शारीरिक आजाराप्रमाणेच असतो. त्यामुळे जनजागृतीची खरंच गरज आहे, मात्र तितकंच पुरेसं नाही. तर मानसिक आजारावर मात करण्यासाठी तशी योग्य व्यवस्थाही असायला हवी. उपचार सहजरित्या उपलब्ध व्हायला हवेत, मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांची संख्या वाढायला हवी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक आधार मिळत नाही, तो मिळायला हवा.

मानसिक आजाराबाबत लोकांनी व्यक्त होणं का महत्त्वाचं आहे?

तुम्ही जितकं जास्त बोलाल, तितकी लोकं तुम्हाला ऐकतील. जेव्हा तुम्ही शारीरिकरित्या आजारी असताना दिसाल, तेव्हा लोकं तुम्हाला मदत करतील ते तुम्हाला बाहेर फिरायला नेतील, तुम्हाला बरं कसं वाटेल यासाठी प्रयत्न करतील. मात्र जेव्हा मानसिक आजाराचा प्रश्न येतो, तेव्हा लोकं तुमच्यापासून पळ काढतात, तुमच्या मदतीला येत नाहीत. कारणमानसिक आजाराला लोकं समजूनच घेत नाही. मानसिक आजार असलेल्या रुग्णांना फक्त आजारच नव्हे तर अशा गैरसमजुतींशीदेखील लढा द्यावा लागतो आणि त्यामुळेच मानसिक आजाराबाबत व्यक्त होणं खूप गरजेचं आहे.

कुणी पडलं तर आपण त्याला उचलतो, मात्र जर मानसिक आजार असलेल्या व्यक्तीला आपल्याला मदत करायची असल्यास ती नेमकी कशी करावी?

मानसिक आजार असलेल्या काही व्यक्तींशी मानसिक आजाराबाबत बोलणं शक्य होत नाही, कारण या व्यक्तीच आपल्याला मानसिक आजार असल्याचं स्वीकारत नाही. मानसिक आजार नेमका कशामुळे? या प्रश्नाचं एक उत्तर नाही. लोकांनी त्या व्यक्तीची परिस्थिती पाहायला हवी, कारण प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक आजाराला वेगवेगळी परिस्थिती कारणीभूत असते. ते मुद्दाम तसं वागत नाहीत, तर मानसिक आजारामुळे तसं वागत आहेत हे समजून घ्या आणि त्यादृष्टिने त्यांच्याशी मोकळेपणाने बोला.

तुम्ही मानसिक आजारावर मात केली, आता मानसिक आजाराचा सामना करणाऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?

फक्त ठिक आहे, इतकं पुरेसं नाही, तर सर्वकाही ठिक आहे, असं नेहमी म्हणावं. जसे शारीरिक आजारावर उपचार होतात, तसे मानसिक आजारावरदेखील उपचार होऊ शकतात, हे सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. मदत मागा, आशा सोडू नका… सर्वच लोकं समान नसतात, तुमच्यासाठी काय योग्य आहे ते पाहा….जर आजचा दिवस चांगला नाही, तर उद्यासाठी जगायला शिका… पुढे चालत राहा.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here