राज्यातील कंत्राटी B.A.M.S डॉक्टरांच्या मानधनात वाढ!

ग्रामीण आणि आदिवासी पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता दुप्पटीने वाढ करण्यात आलीये. यासंदर्भात सरकारी अध्यादेशही नुकताच जारी करण्यात आलाय.

0
13284
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ग्रामीण आणि आदिवासी पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता दुपटीने वाढ करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सरकारी अध्यादेशही नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयामुळे कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रुग्णांना सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी वैद्यकीय अधिकारी महासंघ संघटनेद्वारे करण्यात आली होती. या मागणीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन करून मानधन वाढीची विनंती केली होती.

राज्य सरकारने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (वर्ग-अ) मानधनात वाढ केली आहे. त्यात एमबीबीएस डॉक्टरांचा उल्लेख आहे. मात्र बीएएमएस डॉक्टरांच्या उल्लेख केला नाही, असं आमदार डावखरे यांनी पत्रात नमूद केलं होतं. यावर आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीची दखल घेत आता राज्य सरकारनं कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सरकारी अध्यादेशही जारी केला आहे.

BAMS

यासंदर्भात ‘माय मेडिकल मंत्रा’शी बोलताना ‘वैद्यकीय अधिकारी महासंघ’ या संघटनेचे (महाराष्ट्र) अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांनी सांगितलं की, “आदिवासी आणि दुर्गम भागात काम करायला एमबीबीएस डॉक्टर तयार होत नसल्याने त्याजागी सध्या बीएएमएस (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) डॉक्टर कार्यरत आहे. दोघांच्याही कामाचं स्वरूप सारखंच असतानाही बीएएमएस डॉक्टर 15 ते 16 हजार मानधनावर काम करतात. या डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली. त्यानुसार आता सरकारने या मागणीची दखल घेत डॉक्टरांना 45 हजार एवढे मानधन देण्यात येणार असून अन्य भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना 40 हजार एवढे मानधन मिळणार आहे.’’

‘राष्ट्रीय आरोग्य अभियान युनियन’ (राज्य) अध्यक्ष नंदूकिशोर कासार म्हणाले की, ‘‘कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना मानधन वाढ देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. जेवढं काम तेवढं वेतन मिळावं ही मागणी आमची आधीपासूनच होती. पण या डॉक्टरांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत डॉक्टरांनाही मानधन वाढ मिळणं गरजेचं आहे. यासंदर्भात वारंवार आम्ही पाठपुरावा करतो आहे. मात्र सरकारने अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही.’’

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter