आरोग्यासाठी चवही आहे महत्त्वाची

चव... हा आहारातील खूप महत्त्वाचा घटक. जिभेचे चोचले पुरवणाऱ्या चवीचा शरीरावरही परिणाम होत असतो. पुरेशी चव आरोग्यासाठी हितकारक आणि अतिप्रमाणात चव ही आरोग्यासाठी घातक असते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

चव… हा आहारातील खूप महत्त्वाचा घटक. गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट या चवी आपण विविध पदार्थांतून चाखत आलोत. या चवींना आयुर्वेदात अनुक्रमे मधूर रस, अम्ल रस, लवण रस, तिक्त रस, कटू रस, आणि कषाय रस म्हटलं जातं. चवीनं खाणं म्हणजे जिभेचे चोचले पुरवणे, असं सर्वसामान्य समजलं जातं. मात्र याच चवी आरोग्याशीही निगडित आहेत. पुरेशी चव आरोग्यासाठी हितकारक आणि अतिप्रमाणात चव ही आरोग्यासाठी घातक आहे.

गोड (मधूर रस)

गोड चवीमुळे शरीराचे बल आणि आकारमान वाढतं, वर्ण सुधारतो. गोड खाल्ल्यानं पित्त, वात कमी होतं. केसांसाठी गोड चव हितकारक आहे. मात्र गोड पदार्थ अधिक खाल्ल्यानं मेद, कफ आणि गळ्याभोवती गाठी होतात. तसंच पाचक शक्ती कमी होते.

आंबट (अम्ल रस)

आंबट चव शरीरातील पाचक शक्ती वाढवते. ही चव हृदयासाठी हितकारक आहे. कोष्ठात अडकलेल्या वातालाही खालच्या दिशेनं सरकवण्याचं काम आंबट चव करते. मात्र त्याच्या अतिसेवनानं कफ, पित्ताचा त्रास होतो, तहान लागते, चक्कर येते, अंगाला खाज आणि सूज येते.

खारट (लवण रस)

खारट चव शरीरातील पाचक अग्नी वाढवते. त्यामुळे उदरात अडकलेला वात मोकळा होण्यास मदत होते. शरीरात जर गाठी झाल्या असतील, तर त्या गाठीही खारट चव विरघळवते. मात्र खारट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास केसांवर त्याचा परिणाम होतो. केस लवकर पिकणं, गळणं अशा समस्या निर्माण होतात, त्वचेवर सुरकुत्या पडतात, तहान वाढते.

कडू (तिक्त रस)

कडू खाल्ल्यानं तोंडाला चव येते. पोटातील जंत कमी होतात. त्वचाविकार दूर होतात. पित्त आणि कफ होत नाही. कडू चव शरीरातील मेद, चरबी, मळ यांचं शोषण करते. मात्र जास्त कडू खाल्ल्यानं शरीरातील शक्ती कमी होते आणि वात वाढतो.

तिखट (कटू रस)

तिखटामुळे कफ दूर होतो. तिखट चवीमुळे चरबी कमी होते. त्वचाविकार दूर ठेवण्यासाठी तसंच सूज कमी करण्यात तिखट खूप फायदेशीर आहे. तिखटामुळे कफही कमी होतो. मात्र अति तिखट खाण्याच्या सवयीमुळे प्रजनन क्षमता कमी होते. तहान लागते आणि चक्कर येते.

तुरट (कषाय रस)

तुरट चव पित्त आणि कफाचा नाश करते, रक्त शुद्ध करण्यास आणि जखम भरण्यास मदत होते. त्वचेसाठीही तुरटी खूप परिणामकारक आहे. तुरट चवीमुळे चरबीही कमी होते. तुरट चवीच्या अतिसेवनानं तहान लागते, पोटात वात होतो, सांध्यांच्या हालचालींवर परिणाम होतो. इतकंच नव्हे, तर शुक्रधातूंचा नाश होतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter