एनआयसीयूच्या धर्तीवर नाशिकच्या एसएनसीयूचे श्रेणीवर्धन तातडीने करा- आरोग्यमंत्री

एनआयसीयू सुरु करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, विशेषज्ञ यांची यांची गरज आहे. ते उपलब्ध हाईपर्यंत तातडीने पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात असलेल्या एसएनसीयूचे एनआयसीयूच्या धर्तीवर श्रेणीवर्धन करावं, असं राज्याचे आऱोग्यमंत्री दिपक सावंत यांनी सांगितलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नाशिकमध्ये प्रायोगिक तत्वावर नवजात अतिदक्षता विभागाच्या(एनआयसीयू) धर्तीवर एसएनसीयूचं श्रेणीवर्धन करण्यात येणारे. मंत्रालयातील बैठकीदरम्यान नाशिक व अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांच्या यंत्रसामुग्री दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक व अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एनआयसीयू सुरु करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

नाशिक व अमरावती येथे एनआयसीयू सुरु करण्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ, अत्याधुनिक यंत्रसामुग्री  आणि वापराकरिता मार्गदर्शक तत्वं तयार करण्यासाठी ३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत म्हणाले.

डॉ. सावंत पुढे म्हणाले की, “एनआयसीयू सुरु करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, विशेषज्ञ यांची यांची गरज आहे. ते उपलब्ध हाईपर्यंत तातडीने पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात असलेल्या एसएनसीयूचे एनआयसीयूच्या धर्तीवर श्रेणीवर्धन करावं ज्यामुळे कमी वजनाच्या बालकांवर उपचार करुन त्यांना वाचवण्यात यश मिळेल. शिवाय बांधकामाचा तातडीने आराखडा सादर करावा.”

“तर अमरावतीमध्ये देखील याच पद्धतीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेत. या ठिकाणी १६ खाटांच्या एसएनसीयूचं श्रेणीवर्धन करुन ते ३८ खाटांचं करावं. तर एनआयसीयूसाठी लागणारं मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीच्या उपलब्धतेसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी केईएम रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ.नानावटी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे” अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांनी नाशिक, अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील नादुरुस्त यंत्रसामुग्रीचा आढावा घेतला. धारणी येथील एसएनसीयूचे काम प्रगती पथावर असून ते वेळेत पुर्ण करावे अशा सूचनाही डॉ.सावंत यांनी दिल्यात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter