आयएमए डॉक्टरांचा देशव्यापी संप मागे

केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्याच्या निर्णयानंतर आय़एमएने आपला संप मागे घेतलाय. आयएमएने सर्व डॉक्टरांना तात्काळ कामावर परतण्याचे आदेश दिलेत. मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून डॉक्टरांनी संप पुकारला होता.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

केंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक संसदीय समितीकडे पाठवलं आणि देशाभरातील डॉक्टरांनी आपला बारा तासांचा संप मागे घेतला. आयएमएने देशभरातील सदस्यांना तात्काळ कमावर रूजू होण्याचे आदेश दिलेत. डॉक्टरांच्या संपामुळे काही रूग्णांना त्रास सहन करावा लागला.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, “सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आम्ही आमचा संप तात्काळ मागे घेतलाय. सर्व डॉ़क्टर तात्काळ कामावर रूजू होतील.”

तर, माय मेडिकल मंत्राशी बोलताना आयएमएचे राष्ट्रीय सह-सचिव डॉ. मंगेश पाटे म्हणाले की, “संसदीय समिती काय शिफारस करते आणि सरकार त्यावर काय निर्णय घेतं यावर आमचं पुढचं पाऊल ठरणार आहे. आम्ही या विधेयकाबाबत सरकारशी चर्चा करत राहू. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही आमचं आंदोलन सुरुच ठेवणार आहोत.”

नॅशनल मेडिकल कमिशन आणि डॉक्टरांच्या संपाचा मुद्दा मंगळवारी राज्यसभेतही उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा म्हणाले, “इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांसोबत माझी चर्चा झाली. डॉक्टरांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यात आल्यात. हे विधेयक वैद्यकीय पेशासाठी आणि देशासाठी चांगलं असल्यानेच सरकार आणण्याचा प्रयत्न करतंय.”

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक, डॉक्टरांच्या विरोधात असल्याने डॉक्टर सरकारवर नाराज आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी देखील अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताना डॉक्टरांना एकजूटीने राहण्याचं आवाहन केलं होतं. डॉ. वानखेडकर यांनी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल असं वक्तव्य आयएमएच्या मुंबईत झालेल्या परिषदेत केलं होतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter