गर्भात असतानाच हृदयासंबंधीच्या आजारांचं निदान करणं शक्य

फीटल इको या अत्याधुनिक पद्धतीच्या वापराने आईच्या पोटात असलेल्या गर्भाच्या हृदयासंबंधीच्या आजाराचं निदान करणं शक्य आहे. भारतातील १२० मुलांपैकी १ मूल हे हृदयाच्या आजाराने ग्रस्त असल्याचं दिसून येतं.

0
174
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

बऱ्याच लहान मुलांना जन्मतः हृदयासंबंधीचे आजार असतात. अनेकवेळा या आजारांचं उशीरा निदान होतं. भारतातील
१२० मुलांपैकी १ मूल हे हृदयाच्या आजाराने ग्रस्त असल्याचं दिसून येतं. मात्र आता आईच्या गर्भात असतानाच हृदयासंबंधीच्या आजाराचं निदान करणं शक्य होणार आहे.

फीटल इकोकार्डियोग्राफी (फीटल इको) या अत्याधुनिक पद्धतीचा वापर करुन हे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आईच्या पोटात असलेल्या गर्भाच्या हृदयासंबंधीच्या आजाराचं निदान करणं शक्य आहे.

या तंत्रज्ञानाविषयी पी.डी. हिंदुजा, नानावटी रूग्णालय आणि इतर रूग्णालयांत बाल-हृदयरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ. क्षितीज सेठ म्हणाले की, “गर्भधारणेला १८ किंवा २० आठवड्यांचा कालावधी झाल्यावर ही पद्धत वापरता येते. याद्वारे गर्भाच्या हृदयाची लक्षपूर्वक तपासणी केली जाते आणि त्यावरुन गर्भाला हृदयासंबंधीचा कोणता आजार आहे का हे समजण्यास मदत होते.”

डॉ.सेठ पुढे सांगतात की, “काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक १९ आठवड्यांची गर्भवती आली होती. जेव्हा त्या महिलेवर फीटल इको पद्धतीचा वापर करण्यात आला. या महिलेच्या गर्भात असणाऱ्या बाळाला हृदयासंबंधीचा गंभीर आजार आहे, हे पुढे आलं. त्यानंतर त्या जोडप्याने गर्भपात करण्याचं ठरवलं.”

याविषयी चेन्नईमध्ये एक संशोधन करण्यात आलं. फीटल इकोकार्डियोग्राफीच्या सहाय्याने एकूण १८० जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ प्रकरणांमध्ये गर्भातील बाळाच्या हृदयाला आजार असल्याचं आढळून आलं. तर १२ गर्भांनाही काही आजार असल्याचं पुढे आलं. यानंतर त्यांचा गर्भपात करण्यात आला. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉरमेशन या संस्थेद्वारे हे संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता.

यासंदर्भात फोर्टिस रुग्णालयातील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. स्वाती गारेकर म्हणाल्या की,“गर्भाच्या अवस्थेबद्दल समुपदेशन करण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो. याद्वारे आईनं कुठली काळजी घ्यावी या संदर्भात समुपदेशनही होतं. या तंत्राचा वापर चांगल्या कारणांसाठी होणं गरजेचं आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter