तुम्हाला भीतीदायक स्वप्नं पडतायेत… असू शकतो आजार

रात्री झोपेत पडणारी भीतीदायक स्वप्नं आपल्या मनावर ठसा उमटवून जातात. कधी कधी ही स्वप्नं म्हणजे आपल्या वाईट आठवणींचं प्रतिबिंब असतं.भीतीदायक स्वप्नं पडणं हा एक आजार आहे. याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉडर म्हणतात.

तुम्हाला भीतीदायक स्वप्नं पडतात? मग करा हे उपाय
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

स्वप्न…एक सुंदर अनुभव. पण स्वप्न कधी चांगली, तर कधी भीतीदायक असतात. चांगली स्वप्नं पाहताना आपलं मन हुरळून जातं. तर, भीतीदायक स्वप्न पाहताना झोपेतून अचानक जाग येते. आणि मनावर या स्वप्नांची छाप बसते. कधी कधी तर यामुळे मानसिक त्रास होऊ लागतो.

२० वर्षांचा अमित (बदलेले नाव) रात्री अचानक जागा व्हायचा. त्याला रोज रात्री भीतीदायक स्वप्न पडायची. आणि त्याची झोपमोड व्हायची. अखेर अमितने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टींची भेट घेतली.

डॉ. शेट्टी सांगतात, “अमित १२ वर्षांचा असताना तो राहात असलेल्या भागात दंगल झाली. मात्र त्यानंतर तो आपल्या गावी निघून गेला आणि आपलं काम करू लागला. त्याने दंगलीच्या सर्व आठवणी आपल्या मनातून काढून टाकल्या. त्याला वाटलं आपण दंगलीच्या सर्व आठवणी विसरलो. पण हे खरं नव्हतं. या आठवणी, त्याची स्वप्नं बनून परतली. अमितला पडणाऱ्या स्वप्नात काही लोक तलवार घेऊन त्याच्यावर हल्ला करताना दिसायचे.”

डॉ. शेट्टी पुढे सांगतात, “भीतीदायक स्वप्नांबाबत अमितने अनेक औषधं घेतली होती, पण फायदा झाला नाही. माझ्याकडे आल्यावर मी त्याचं मूल्यांकन केलं आणि त्याच्या मनात लपलेली भीती शोधून काढली. यासाठी मी न्यूरो लिंग्युएस्टीक प्रोग्रामचा वापर केला. यातून मी त्याच्याशी संवाद साधला.”

रात्रीची स्वप्नं ही वेगवेगळी आणि भीतीदायक असतात. यावेळी झोपेत तुमचे डोळे खूप जोरजोरात हालचाल करतात. वाईट स्वप्न पडण्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त असलं तरी अशी स्वप्नं कोणालाही पडतात. केईएम हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. हिना मर्चंट सांगतात, “वाईट स्वप्नं जास्त करून लहान मुलांना पडतात. आणि अशा स्वप्नांमध्ये मुलं दचकून जागी होतात.”

जसलोक हॉस्पिटलमधील मानसोपचार संशोधक आणि सल्लागार डॉ. शमसा सोनावाला यांच्या मते, “अर्ध्याहून अधिक लोकांना कधी-कधी असा वाईट अनुभव आलेला असतो. सुमारे ५ ते १० टक्के लोकांना अशी वाईट स्वप्नं वारंवार पडत असतात. ती एक समस्याच आहे. याचा त्यांना प्रचंड त्रास होतो.”

कधी कधी रात्री पडणारी भीतीदायक स्वप्नं म्हणजे अंतरमनाचे पडसाद असतात. एखाद्या व्यक्तीच्या मनात खोलवर दडलेली भीती, चिंता, अपराधी भावना यामुळे असे होऊ शकते. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आरती श्रॉफ सांगतात, “अशाप्रकारे नेहमीच भीतीदायक स्वप्नं पडणं हा एक आजार आहे. याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉडर म्हणतात. यात लोकांना आपला कोणीतरी पाठलाग करतंय असं वाटतं, त्यांना आपण परीक्षेला बसलोय मात्र काहीच आठवत नाहीय, किंवा खूप साऱ्या गर्दीत आपण एकटेच नग्न आहोत, अशी स्वप्नं पडतात.”

डॉ. शेट्टी सांगतात, “भीतीदायक स्वप्नांमुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणी चिंताग्रस्त होतो, कोणाला जास्त थकवा जाणवतो. त्याचबरोबर संतप्त होणे, चिडचिड, उदासीनता निर्माण होऊ शकते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाबावरही परिणाम होऊ शकतो.”

अशीच स्वप्नं संकल्प चाफेकरलाही पडतात. “मी झोपेत असताना मला कोणीतरी खाली खेचत असल्यासारखे वाटते. मला घाबरायला होते आणि मी अचानक झोपेतून जागा होतो. अशावेळी मी झोपेतून उठल्यावर पाणी पितो. ध्यान लावतो, प्रार्थना करतो किंवा एखादं संगीत ऐकतो. यातून मला शांत होण्यास मदत मिळते.” असं संकल्प सांगतो.

डॉ. आरती यांच्या म्हणण्यानुसार, वाईट आणि भीतीदायक स्वप्नं मानसोपचारतज्ज्ञांना त्या व्यक्तीची मूळ भावनिक समस्या शोधण्यास मदत करतात. यावर केलेले समुपदेशन त्या व्यक्तीला त्रासातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकते. अशावेळी शांत आणि आनंददायक संगीत ऐका. मद्यपान करणे आणि तिखट पदार्थ खाणे टाळा. झोपण्यापूर्वी दोन तास तरी मोबाईल वापरू नका. रात्री झोपताना टीव्ही आणि कॉम्प्युटरपासून दूर राहा.

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here