प्रोबायोटीक्स म्हणजे काय आणि त्याचे फायदे

प्रोबायोटीक्स म्हणजे काय याची माहिती अनेकांना माहिती नसते. म्हणूनच यासाठीच वाशीच्या हिरानंदानी हॉस्पिटलमधील चीफ क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट स्वाती भूषण यांनी याबाबत माहिती दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

प्रोबायोटिक्स हे मायक्रोऑरगॅनिझम्स असतात. यात साधारणपणे बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू काही विशिष्ट प्रकारचे यीस्ट्स असतात. याच्या सेवनाने अनेक प्रकारचे लाभ होतात. जीवाणूंच्या विशिष्ठ प्रक्रियेतून तयार केलेल्या दही किंवा योगर्ट यांसारख्या पदार्थांमधून प्रोबायोटिक्स मिळतात. प्रोबायोटिक सप्लिमेंट्स आणि आंबवलेल्या भाज्या असे पदार्थही प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत असतात. ‘चांगले किंवा उपकारक जीवाणू’ म्हणून ओळखले जाणारे प्रोबायोटिक्स पोटातील चांगल्या आणि वाईट विषाणूंमध्ये संतुलन ठेवतात.

प्रोबायोटीक्सचे फायदे-

  • ‘अँटीबायोटिक्समुळे होणारा डायरियाचा त्रास ७२ टक्क्यांपर्यंत कमी होण्यात प्रोबायोटिक्सची मदत होते. एका अभ्यासाच्या माध्यमातून हे स्पष्ट झालंय. ‘ट्रॅव्हल डायरिया’ (प्रवासामुळे होणारा त्रास) आणि ‘जंतूसंसर्गामुळे होणाऱ्या डायरिया’तही यामुळे आराम मिळतो
  • इरीटेबल बॉवल सिंड्रोम या मोठ्या आतड्याच्या सामान्यपणे आढळणाऱ्या आजारावरही प्रोबायोटीक्स उपयुक्त ठरतं. तसंच या आजाराशी संबंधित गॅस, पोट फुगणं आणि पोटात गोळं येणे असे त्रासही कमी होतात.
  • लॅक्टोस (दूधातील एक घटक) न पचणाऱ्या रुग्णांसाठी प्रोबायोटिक्स सुयोग्य ठरतात. प्रोबायोटिक बॅक्टेरियामुळे लॅक्टोसचे रुपांतर लॅक्टिक अॅसिडमध्ये होतं.
  • प्रोबायोटिक्स पचनमार्ग आरोग्यदायी ठेवून रोगप्रतिकारक प्रणालीला संरक्षण देतात. रोगप्रतिकारक प्रणालीतील ७० ते ८० टक्के ऊती पचनसंस्थेत असतात. यामुळे अॅलर्जी आणि जंतूसंसर्गापासूनही संरक्षण मिळतं. आणि यामुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारक प्रणालीला सुधारण्यातही त्यामुळे मदत होते.
  • प्रोबायोटिक्समुळे श्वसनमार्गातील जंतूसंसर्ग होण्याची शक्यता आणि गंभीरता कमी होते. तसंच युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा (यूटीआय-मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग) धोका कमी होतो.
  • मानसिक आरोग्य आणि एकूण हितकारक परिस्थितीसाठीही प्रोबायोटिक्स महत्त्वाचे असतात. कारण त्यामुळे चिंता, उदासिनतेची लक्षणं कमी होतात, ताण कमी होतो आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
  • एका अभ्यासातून स्पष्ट झाल्यानुसार प्रोबायोटिक्समुळे सूज कमी होते. प्रोबायोटिक्समुळे सी-रीअॅक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी)ची पातळी कमी होते. विविध आजारांमध्ये येणाऱ्या सूजेमागे हेच कारण असतं.
  • प्रोबायोटिक्समुळे हृदयाचं संरक्षण होतं. प्रोबायोटिक्सच्या सेवनामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते शिवाय एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते आणि एलडीएल (वाईट) आणि एचडीएल (चांगले) कोलेस्टेरॉलचं संतुलन सुधारतं. प्रोबायोटिक्समुळे काही प्रमाणात रक्तदाबही नियंत्रित राहतो.
  • प्राबायोटिक्समुळे मधुमेही रूग्णांमधील रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं, ग्लुकोझ टॉलरन्स वाढतो आणि HBA1Cची पातळी कमी होते. यामुळे इन्सुलिन रेझिस्टंस सुधारतो आणि टाईप २ मधुमेहातील वैद्यकीय स्थिती सुधारते.
  • हाडांची झीज कमी होते आणि त्यांचे आरोग्य वाढतं. याशिवाय फ्रॅक्चर होण्याचं प्रमाणंही कमी होतं. हाडांची झीज कमी झाल्याने ओस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. प्रोबायोटिक्समुळे हाडांच्या नव्या पेशींच्या वाढीलाही चालना मिळते.

दही, रायता, ताक आणि स्मूदी प्रक्रिया केलेल्‍या घरगुती नैसर्गिक अन्नपदार्थांच्या माध्यमातून तुमच्या रोजच्या आहारात घेऊन प्रोबायोटिक्सचा समावेश करा. चक्का वापरून केलेले विविध प्रकारचे डिप्स व सलॉड्स खा आणि त्यातून असंख्य आरोग्यदायी फायदे मिळतात.

कोबी, बीट, गाजर आणि काकडी यांसारख्या भाज्या मिठाच्या पाण्यात ठेवून फक्त त्यांच्यातील नैसर्गिक लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया वापरून आंबवता येतात. दैनंदिन पातळीवर दुकानात मिळणारे योगर्टस् आणि पेय वापरताना त्यात अतिरिक्त साखर, रंग आणि प्रीझर्व्हेटिव्ह्स नसतील, याची खात्री करा. प्रोबायोटिक्स कॅप्सूल्स आणि सस्पेंशन वापरताना तुमच्या डॉक्टर किंवा न्युट्रिशनिस्ट यांना भेटून त्याच्या परिणामांबद्दल जाणून घ्या.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter