मुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे

आयुष डॉक्टरांना ब्रीजकोर्सच्या मुद्द्यावर होमिओपॅथी डॉक्टरांनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केलं होतं. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. पण, केंद्र सरकारने एनएमसी विधेयकात ब्रीजकोर्स समाविष्ट करावा या मागणीवर होमिओपॅथी डॉक्टर ठाम आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • राज्य सरकारने घेतली होमिओपॅथी डॉक्टरांच्या आंदोलनाची दखल
  • होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे
  • आरोग्य सचिवांशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण आंदोलन अखेर डॉक्टरांनी मागे घेतलंय. राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर होमिओपॅथी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकात आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिसची परवानगी देणारा मुद्दा असावा यासाठी होमिओपॅथी डॉक्टर्स रस्त्यावर उतरले होते. बुधवारी डॉक्टरांनी सर जे.जे रुग्णालयाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केलं होतं.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना ऑल इंडिया होमिओपॅथी फेडरेशनचे सदस्य डॉ. प्रकाश राणे म्हणाले, “राज्य सरकारने  आंदोलनाची दखल घेतलीये. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

डॉ. राणे पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात आयुर्वेद डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी आहे. यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचा सरकारचा विचार नाही. पण, देशभरात हा ब्रीजकोर्स ठेवायचा का हा निर्णय केंद्राच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे, नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा अभ्यास करून, महाधिवक्त्यांची मदत घेतली जाईल, असं आश्वासन सरकारनं दिलंय.”

एवढंच नाही तर, येत्या काही दिवसात आपल्या मागण्यांसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. ब्रीजकोर्स हवा या मागणीसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स तर, ब्रीजकोर्सच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अॅलोपॅथी डॉक्टर्स आमने-सामने आहेत.

केंद्र सरकारने संसदीय समितीच्या शिफारसी मान्य करत, ब्रीजकोर्सचा मुद्दा नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातून काढून टाकला. पण, सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिलाय. महाराष्ट्र सरकारने राज्यात आयुष डॉक्टरांसाठी मॉडर्न मेडिसिनचा ब्रीजकोर्स सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter