“होमिओपॅथी डॉक्टरांना ‘कम्युनिटी हेल्थ’मध्ये संधी द्या”

होमिओपॅथी डॉक्टरांना कम्युनिटी हेल्थमध्ये समाविष्ट करून घ्यावं, या मागणीसाठी महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ होमिओपॅथी संघटनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि लेखी निवेदन दिलं आहे.

0
1177
होमिओपॅथी औषधं घेताय? ही पथ्यं पाळा..
सोर्स- Cupping Resource
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आदिवासी आणि दुर्गम भागात कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करण्यास एमबीबीएस डॉक्टर तयार होत नाहीत. अशा ठिकाणी होमियोपॅथी डॉक्टर रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र तरीदेखील त्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी दाद मागितली आहे.

सरकारने कम्युनिटी हेल्थमधील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आणि सीएचओ पदावर नोकरी द्यावी, याबाबत सेंट्रल काऊन्सिल ऑफ होमियोपॅथी संघटनेनं राज्य सरकारला पत्र पाठवून निर्देशही दिले होते. मात्र तरी सुद्धा राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत या पदांसाठी आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांना पात्र ठरवण्यात आलं. तर होमिओपॅथी डॉक्टरांना डावलण्यात आलं.

त्यामुळे होमिओपॅथी संघटनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिलं आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे अनेक होमिओपॅथी डॉक्टरांनी अलोपॅथीचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यानंतरही त्यांना भरतीमध्ये डावललं जात असल्याचा आरोप होमियोपॅथी संघटनेनं केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात होमियोपॅथी डॉक्टरांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात ‘माय मेडिकल मंत्रा’शी बोलताना ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ होमियोपॅथी’चे डॉ. प्रशांत राणे म्हणाले की, ‘‘ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असताना होमियोपॅथी डॉक्टर या ठिकाणी राहून काम करायला तयार आहेत. होमियोपॅथी डॉक्टर ग्रामीण भागात तुटपुंज्या पगारात सेवा देत आहेत. मात्र सरकारी वैद्यकीय सेवेत काढलेल्या भरती प्रक्रियेतून होमियोपॅथी डॉक्टरांना वगळलं आहे. या डॉक्टरांना सरकारी सेवेत घेण्यासाठी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक मागण्या आणि आंदोलनं करण्यात आली. मात्र त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही’’

‘‘सध्या महाराष्ट्रात 72 हजार होमियोपॅथी डॉक्टर कार्यरत आहेत. तर 3 हजार डॉक्टरांनी सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला आहे. अनेक डॉक्टर नोकरीविना आहेत. यासाठी होमियोपॅथी डॉक्टरांना सरकारी सेवेत सामावून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदाची 5,716 पदांची भरती प्रक्रिया तातडीने थांबवावी आणि नव्याने जाहिरात काढून त्यात होमियोपॅथी डॉक्टरांना स्थान द्यावं”, अशी मागणी डॉ. राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ होमियोपॅथी संघटनेचे सदस्य डॉ. चंद्रवड क्षीरसागर म्हणाले की, ‘‘सरकारी सेवेतील भरती प्रक्रियेपासून होमियोपॅथी डॉक्टरांना वगळल्यानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने भरती प्रक्रियेत होमियोपॅथी डॉक्टरांना सामावून का घेतलं नाही, याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला आठ आठवड्यात उत्तर मागितलं. मात्र अद्यापही या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळालेली नाही”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter