ग्रामीण रुग्णांना सरकारी आरोग्य शिबिरांचा आधार

ग्रामीण भागातील मुलांना आरोग्याच्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम हाती घेतला. ज्यात २०१६-१७ या वर्षी २५३० मुलांना हृदयाचा आजार असल्याचं निदान झालं. ग्रामीण भागातल्या जनतेला या आरोग्य शिबिरांचा चांगलाच फायदा होतोय. आरोग्याच्या सुविधा तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होतेय.

0
269
ग्रामीण रुग्णांना सरकारी आरोग्य शिबिरांचा आधार
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ग्रामीण भागात आयोजित केल्या जाणाऱ्या आरोग्य शिबिरांचा, ग्रामीण भागातल्या जनतेला चांगलाच फायदा होतोय. आरोग्याच्या सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना आजारांवर उपचार मिळणं शक्य झालंय.

आरोग्य सुविधा ग्रामीण भागातल्या जनतेला मिळावी, यासाठी राज्य सरकारतर्फे ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ’ अभियानांतर्गत, जिल्हा स्तरावर आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात येतं. या शिबिरांच्या माध्यमातूनच २०१६-१७ या वर्षी महाराष्ट्रात २५३० लहान मुलांना हृदयाचा आजार असल्याचे निदान झाले. यातील १४३० मुलांवर सरकारी मदतीतून मोफत शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा मिळणे खूपच अवघड आहे. अशा स्थितीत लहान मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. या अनुषंगाने शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यातील शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात हृदय व पोटाचे विकार, डोळे तसेच अन्य आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक मुलांवर मोफत शस्त्रक्रियाही करण्यात आली.

३११ मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी राजीव गांधी योजनेतून मदत मागण्यात आली आहे. यातील १६५ मुलांवर शस्त्रक्रिया होणार आहे. ही सर्व मुलं 0 ते 15 वयोगटातील आहेत.

केईएम रुग्णालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अंकुर फाटरपेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केईएममध्ये महिन्याला जवळपास 120 बालरुग्ण हृदयरोगाच्या उपचारासाठी येतात. तर नानावटी रुग्णालयातील सर्जन डॉ. रोहित शहापूरकर म्हणाले की, “हृदयविकाराचे प्रमाण लहान मुलांमध्ये वाढताना दिसतेय. हा आजार मुलांना जन्मतःच असतो, पण कालांतराने त्याचा त्रास जाणवू लागतो. नानावटीत दर महिन्याला हृदयविकाराने ग्रस्त असलेली ३० ते ४० लहान मुलं उपचारासाठी येतात.”

डॉ. शहापूरकर पुढे म्हणतात की, “सरकारतर्फे सुरू असलेली आरोग्य तपासणी शिबिरे गरजेची आहेत. या योजनेमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना नक्कीच फायदा होतोय. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य तपासणीसाठी शहरात यावं लागतं. त्यामुळे अशा शिबिरांद्वारे लहान मुलांना आरोग्य सुविधा देण्याची संकल्पना नक्कीच उत्तम आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter