सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘मानसिक आरोग्य व्यवस्थापन’ करणं गरजेचं- आरोग्यमंत्री

सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशावेळी लोकांना कामाचा व्याप व वेळेचे व्यवस्थापन करावे लागते. या सर्व धावपळीत आयुष्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामासह स्वतःचं मानसिक आरोग्य जपणे गरजेचं असून याकरता ‘मानसिक आरोग्य व्यवस्थापन’ करा, असा सल्ला सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असतो. याशिवाय महिलावर्गाला घर सांभाळून कार्यालयीन काम करावे लागते. अशावेळी घरं आणि काम अशा दुहेरी भूमिका बजावताना अनेकदा मानसिक ताण येण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर मंत्रालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी कार्यालयीन ताण-तणाव व मानसिक आरोग्य व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं.

याप्रसंगी आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत, राज्यमंत्री विजय देशमुख, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, आरोग्य आयुक्त संजीवकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक ताणतणाव म्हणजे काय? आणि त्यावर मात करण्यासाठी काय केले पाहिजे? यासंदर्भात त्यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले.

“कर्मचाऱ्यांनी काम करताना मनावर ताण न घेता. कामासह वेळेचंही नियोजन करायला शिका जेणेकरून कामाचा अतिरिक्त भार तुमच्यावर पडणार नाही. त्यामुळे मानसिक ताणतणावापासून तुम्ही दूर राहू शकाल, असे डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.”

“विशेषतः सर्वसामान्यांची कामे हाताळताना ती वेळेत मार्गी लावण्यासाठी तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मानसिक आरोग्य जपत ताणतणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. बऱ्याचदा मानसिक तणावामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना मधुमेह, हृदयविकार इत्यादी विकार होतात. या विकारांपासून दूर राहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे व कामाचे योग्य व्यवस्थापन करावेत. याशिवाय नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा” असंही  आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितलंय.

“मानसिक ताणतणावापासून कर्मचाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी लवकरच आठ दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल. या शिबीरात नामांकित खासगी रुग्णालयाच्यावतीने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार व नेत्रचिकित्सा इत्यादी विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात येतील. या उपक्रमाचा मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा” असं आवाहनही डॉ. सावंत यांनी केले आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter