केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या डॉक्टरांचं पथक केरळमध्ये पोहोचलंय. यामध्ये मुंबईतील जे.जे रूग्णालय आणि पुण्यातील ससून रूग्णालयातील डॉक्टरांचा समावेश आहे. लवकरच हे डॉक्टरांचं पथक विविध भागात जाऊन नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करतील. या डॉक्टरांच्या टीमसोबत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन देखील उपस्थित आहेत.
केरळमध्ये पोहोचल्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केलंय.
माय मेडिकल मंत्राशी बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन म्हणाले की, “पुण्यातील ससून आणि मुंबईतील जे.जे रूग्णालयातील 100 डॉक्टरांची टीम या ठिकाणी दाखल झालीये. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांचा समावेश आहे. यासोबत महाराष्ट्रातून औषधांचा मुबलक साठा आणण्यात आलाय. हे अधिकारी आवश्यक ठिकाणी जाऊन नागरिकांवर औषधोपचार करतील. यामध्ये रूग्णांची तपासणीही केली जाईल. याशिवाय अजून गरज भासल्यास पुढच्या टप्प्यात म्हणजे दोन-तीन दिवसांत पुढची टीम या ठिकाणी दाखल करण्यात येईल.”
महापुरानंतर केरळात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होतेय. त्यामुळे डॉक्टर आणि औषधांची केरळला सद्य स्थितीला सर्वात जास्त गरज आहे. केरळला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेत नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी 100 डॉक्टरांची टीम पाठवलीये.