‘MBBS डॉक्टरांना बढती आधी ग्रामीण भागात सेवा सक्तीची करा’- उपराष्ट्रपती

देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूंनी MBBS विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील सेवा सक्तीची करण्याचं मत नोंदवलंय. ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमी भरून काढण्यासाठी, नव्याने MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना बढती देण्याअगोदर ग्रामीण भागातील सेवा सक्तीची करा, अशी सूचना नायडू यांनी केलीये. 15 व्या जागतिक ग्रामीण आरोग्य परिषदेच्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती बोलत होते

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • देशभरातील ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे
  • ग्रामीण भागात डॉक्टर नसल्याने दुर्गम, आदिवासी भागातील लोकांना आरोग्याच्या योग्य सुविधा मिळत नाहीत
  • डॉक्टर ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी इच्छुक नसतात. ग्रामीण भागातील सेवेपेक्षा शहरी भागात वैद्यकीय सेवा देणं पसंत करतात

ग्रामीण भागात काम करण्यासाठी डॉक्टर तयार होत नसल्याने, सरकारच्या आरोग्य योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे ग्रामीण जनतेला आरोग्याचे चांगले उपचार मिळू शकत नाहीत. महाराष्ट्रातही ग्रामीण भागात डॉक्टरांचा प्रश्न मोठा गंभीर आहे. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी नव्याने एमबीबीस झालेल्या डॉक्टरांना बढती देण्याआधी ग्रामीण भागातील सेवा सक्तीची करा अशी सूचना उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी सरकारला केलीये.

जागतिक ग्रामीण आरोग्य परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले, “अल्प-उत्पन्न आणि विकसनशील देशात ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवांमध्ये मोठी तफावत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे योग्य तंत्रज्ञान आणि डॉक्टरांची कमतरता. यासाठी आरोग्य सेवा देणाऱ्या सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा कशी देता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे.”

उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, “ग्रामीण भागात डॉक्टर-रुग्ण संख्या, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, योग्य सोयी-सुविधा अशा अनेक मुद्यांवर मात करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. यासाठी फॅमिली डॉक्टरची संकल्पना पुन्हा नव्याने समाजात रूढ केली पाहिजे.”

 जागतिक ग्रामीण आरोग्य परिषदेच्या कार्यक्रमात काय म्हणाले उपराष्ट्रती 

  • जगभरातील ५० टक्के जनता ग्रामीण भागात रहाते. पण, फक्त ३८ टक्के नर्सिंग आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी डॉक्टर ग्रामीण भागात सेवा देतात
  • भारताचा ग्रामीण भाग शहरी भागाच्या तुलनेत आरोग्य सुविधांपासून वंचित राहिलाय. डॉक्टर-रुग्ण समिकरण, आरोग्य सेवा उपलब्द नसणं आणि या सुविधांचा वापर न होणं हे काही प्रमुख मुद्दे आहेत
  • ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी एक उपाय म्हणजे नव्याने एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना बढती आधी ग्रामीम भागात सेवा सक्तीची करणे
  • भारतात ७२ टक्के रुग्णव्यवस्था खाजगी संस्थांद्वारे पाहिली जाते. देशातील ८० टक्के जनता त्यांच्या कमाईतून आरोग्यसेवांवर पैसा खर्च होतो
  • ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आयुष डॉक्टरांची मदत घेता येऊ शकते का. त्यांच्या ज्ञानाचा फायदा होऊ शकतो का. यावर विचार करायला हवा

देशभरातील ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात सोयी-सुविधांची कमी अशी कारणं देत डॉक्टर ग्रामीण भागात काम करण्यासाठी तयार होत नाहीत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter