पहिल्यांदा आई होताना टेन्शन का येतं?

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

प्रथमच आई होणाऱ्या महिलेसाठी बाळाचा जन्म हा तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला तरी या कालावधीत ती महिला शरीराने आणि मनाने थकत असते. या काळात हॉर्मोनच्या पातळीमध्ये चढ-उतार होतात. तज्ज्ञांच्या मते थोड्याफार प्रमाणात चिंताग्रस्त होणं हे सर्रास आढळून येतं आणि पहिल्यांदा आई होणाऱ्या महिला गरोदरावस्थेत असताना अत्यंत तणावाखाली असतात आणि सध्या या आकडेवारीमध्ये भर पडताना दिसतेय.

मुंबईतील स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. पुजा बांदेकर यांच्या सांगण्यानुसार, “नवमातांमधील मानसिक ताण वाढताना दिसतोय. गेल्या पाच वर्षांत अशा महिलांची संख्या किमान १० टक्क्यांनी वाढली आहे. वाढणारं वय, वेदना सहन करण्याची कमी झालेली क्षमता, बैठी जीवनशैली, लठ्ठपणामुळे होणारा मधुमेह, हायपरटेन्शन आणि आयव्हीएफ प्रसूतीसारख्या इतर घटक यासाठी कारणीभूत आहेत.”

पुजा पुढे म्हणाल्या, “या महिलांवर असणाऱ्या ताणाचा बाळावर थेट परिणाम होत नाही कारण तणावासाठी कारणीभूत असलेल्या घटकांना हाताळण्यात येतं आणि त्यानुसार बाळांवरही उपचार करण्यात येतात. वेळेवर उपचार केल्यामुळे मानसिक तणावाशी संबंधित घटक बाळापर्यंत पोहोचत नाहीत. ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा, योगासनं, अॅक्टिव्हिटीमधील बदल आणि शारीरिक विश्रांतीचा सल्ला देण्यात येतो.”

खारघरच्या मदरहूड रूग्णालयातील प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनु विनोद विज म्हणाल्या, “पहिल्यांदा आई होणाऱ्या ७-८% महिलांना मानसिक तणावातून जावं लागतं असल्याचं चित्र गेल्या पाच वर्षांत मला दिसून आलंय. पहिल्यांदा आई होणाऱ्या ज्या महिलांचं वय जास्त आहे तसंच ज्यांचा करिअरकडे कल आहे आणि ज्यांनी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह उपचार (एआरटी) घेतलं आहेत त्यांच्यात मानसिक ताण आढळून येण्याचे प्रमाण अधिक दिसून येतं.

डॉ. अनु यांच्या सांगण्यानुसार, “वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरत असलेल्या घटकांनुसार गर्भधारणा करण्यासाठी एआरटीमध्ये उपचार केले जातात. यात ओव्ह्युलेशन इंडक्शन (ओआय), आर्टिफिशिअल इन्सेमिनेशन (एआय) यासारख्या उपचारांचा समावेश आहे. अशा प्रकारचे उपचार घेतल्यानंतर त्याचा काय परिणाम होईल यामुळे महिलांमध्ये ताण येतो. अशा मानसिक ताणांमध्ये महिलांमध्ये अशक्तपणा, मळमळ, उलट्या, भूक मंदावणं अशी लक्षणं दिसून येतात. त्याचप्रमाणे त्यांना उच्च रक्तदाबाचाही त्रास होऊ शकतो.”

डॉ. अनु पुढे म्हणाल्या, “योगासने, ध्यानधारणा, म्युझिक थेरपी यासारखी रिलॅक्सेशन तंत्रं आणि तणावास कारणीभूत ठरणारे घटक ओळखल्याने मानसिक तणावाचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. त्याचप्रमाणे ज्या महिलांना अशा प्रकारचा मानसिक तणाव असतो, त्यांनी आपल्या पतीशी आणि कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे. वेळेवर अशा प्रकारचा संवाद साधल्याने मानसिक तणाव हाताळण्यास मदत होते. परिस्थिती गंभीर झाली असेल तर त्या महिलेला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेण्याचा सल्ला देण्यात येतो.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter