‘त्या’ जाहिरातींना भुलू नका

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांच्या फसव्या जाहिराती करणाऱ्या औषध उत्पादकांवर कारवाई केली आहे. सुमारे 20 लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

0
2956
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

तुम्हाला वजन कमी करायचं आहे? उंची वाढवायची आहे? सेक्सबाबत समस्या आहे?… कर्करोग, एड्स, मधुमेह यांसारख्या दुर्धर आजारांवर रामबाण उपाय… अशा जाहिराती तुम्ही टीव्हीवर पाहता आणि वृत्तपत्रांमध्ये वाचता… यापैकी एखादं औषध तुम्ही मागवण्याचा विचार करत आहात तर सावध व्हा… कारण अशी जाहिरातबाजी करणाऱ्या औषध उत्पादकांवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.

एप्रिल ते जून 2019 या तीन महिन्यांत एफडीएच्या औषध निरीक्षकांनी 33 ठिकाणी धाडी टाकल्यात. विविध आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा सुमारे 20 लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसंच अशा जाहिराती प्रसिद्ध करणारे 40 प्रकरणी वृत्तपत्रे आणि 57 टीव्ही चॅनेल्सना नोटीस पाठवण्यात आल्यात.

यासंदर्भात माहिती देताना एफडीएच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे म्हणाल्या की, ‘‘खोट्या आणि फसव्या जाहिरातींकडे अनेक लोक आकर्षित होतात आणि डॉक्टरांकडे न जाता स्वतःच मनाप्रमाणे औषध घेतात, हे त्यांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे अशा खोट्या जाहिराती करणाऱ्या औषध कंपन्यांविरोधात एफडीएने मोहीम सुरू केली होती. या मोहिमेद्वारे 33 ठिकाणी छापे टाकून 167 आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषध उत्पादकांवर कारवाई करण्यात आली आहे. 20 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या उत्पादकांवर औषध आणि जादूटोणा कायदा 1954 आणि नियम 1955 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे’’

‘‘या तपासात देशभरात अग्रगण्य मानले जाणारे काही आयुर्वेदिक औषध उत्पादकही अशा जाहिराती करताना आढळून येत आहेत. यासंदर्भात पुढील कारवाई सुरूच आहे. मात्र नागरिकांनी अशा फसव्या जाहिरातींना बळू पडू नयेत’’, असं आवाहनही डॉ. दराडे यांनी केलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter