‘एफडीए’ने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं

भारतीयांचा आयुर्वेदिक औषधांकडे कल वाढताना दिसून येतोय. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली बनावट औषध बनवणाऱ्यांनी आपली दुकानं थाटलीयेत. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने गेल्या तीन वर्षात 57 बनावट आयुर्वेदिक औषधांवर कारवाई केलीये. जप्त करण्यात आलेल्या औषधांचे नमुने मुंबई, औरंगाबाद आणि नागपूरच्या प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • बनावट आयुर्वेदिक औषध विकणाऱ्यांवर एफडीएची करडी नजर
  • तीन वर्षात एफडीएने जप्त केली ५७ बनावट आयुर्वेदिक औषधं

आयुर्वेदिक औषधं बनवणाऱ्या कंपन्यांना औषध बनवण्यासाठी एफडीएचा परवाना घ्यावा लागतो. पण, आयुर्वेदिक औषधं विक्रेते एफडीएच्या अंतर्गत येत नाहीत. याचाच फायदा घेऊन काही आयुर्वेदिक औषध विक्रेते बनावट औषधं बाजारात विकतात. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. एफडीए अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या आयुर्वेदिक औषधांमध्ये अॅलोपॅथी औषधांचा अंतर्भाव करण्यात आला होता. त्यामुळे या औषधांवर कारवाई करण्यात आलीये.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना एफडीएच्या औषध विभागाचे सह-आयुक्त अमृत निखाडे यांनी सांगितलं की, “बनावट आयुर्वेदिक औषधांचा व्यापार फोफावतोय. लोकांचा आयुर्वेदिक औषधांकडे कल वाढतोय. त्यामुळे गल्लीबोळात आयुर्वेदिक औषधी दुकान नजरेस पडतायत. एफडीएला याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे राज्यभरातून ५७ बनावट आयुर्वेदिक औषधे जप्त करण्यात आली आहेत. या जप्त केलेल्या औषधांमध्ये अॅलोपॅथी औषध मिळण्यात आली होती.”

“विशेषतः आतापर्यंत ज्या बनावट आयुर्वेदिक औषधांवर कारवाई करण्यात आली, ती विकेत्यांवर करण्यात आलीये उत्पादकांवर नाही. आयुर्वेदिक औषधं उत्पादनासाठी एफडीएचा परवाना गरजेचं असतो. पण, आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीवर सरकारचा अंकुश नाही. त्यामुळे सर्रासपणे बनावट आयुर्वेदिक औषधं विकून गाहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. याकरता आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीवर बंधन घालण्यासाठी परवाना बंधनकारक करा याकरता राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे” असंही निखाडे यांनी सांगितलं.

आतापर्यंत बनावट आयुर्वेदिक औषधांवर झालेली कारवाई

२०१५-१६ :- १९

२०१६-१७ :- २१

२०१७-१८ :- १७

आयुर्वेदितज्ज्ञ डॉ. मधुरा कुलकर्णी माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणतात, “बॅन्डेड आयुर्वेदिक औषधांच्या नावानं बनावट औषधं विकली जातात. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. बनावट औषधांमुळे लोकांचा आयुर्वेदिक औषधांवरील विश्वास कमी होऊ शकतो. याकरता एफडीएनं केलेली कारवाई योग्यच आहे. शिवाय आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीवर एफडीएनं नियंत्रण ठेवण्यास बनावट आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीवर चाप बसेल.”

तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं की,” अॅलोपॅथी औषधांसह आता आयुर्वेदिक औषध ही ऑनलाईन पद्धतीने विकली जात आहेत. यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका संभवू शकतो. यात काही बनावट औषधांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांना चिठ्ठी शिवाय आयुर्वेदिक औषधांच्या खरेदीवर बंदी घालणं गरजेचं आहे. “

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter