‘फॅक्टर-७’चं टेन्शन तरीही यशस्वी ऑपरेशन

फॅक्टर-७ हा घटक प्रत्येकाच्या शरीरात असतो. जर हा घटक शरीरात नसेल तर, जखमेतून रक्तस्राव थांबत नाही. जगभरात फक्त २०० व्यक्ती अशा आहेत ज्यांच्या शरीरात ‘फॅक्टर-७’ नसल्याची माहिती आहे. असं असूनही ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मिहीरवर शस्त्रक्रिया केलीये.

0
920
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्याला खेळताना नेहमीच लागतं, खरचटतं… मग त्या जखमेतून रक्त येतं. आपण, औषध लावतो आणि रक्त थांबतं. पण, तुम्हाला माहितेय का, हे वाहणारं रक्त कसं थांबतं. नाही ना! मग ऐका, शरीरात रक्त थांबवणारा एक घटक असतो, याला ‘फॅक्टर-७’ असं म्हणतात. हा घटक शरीरात नसला तर रक्त वाहणं थांबत नाही.

तुम्हाला ऐकून धक्का बसेल. जगभरात फक्त २०० व्यक्ती अशा आहेत, ज्यांच्या शरीरात रक्त थांबण्यासाठी मदत करणारा हा ‘फॅक्टर-७’ नाही. आणि या २०० लोकांमधलाच एक आहे पुण्यातील ९ महिन्यांचा चिमुरडा मिहीर देशमाने. मिहीरवर पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी हर्नियावर यशस्वी शस्त्रक्रिया केलीये.

गेल्या ९ महिन्यांत मिहीरला एकदाही इंजेक्शन देण्यात आलेलं नाही. मिहीरचे आई-वडील त्याच्या शरीरावर साधी खरचटण्याची जखमदेखील होऊ देत नाहीत. रक्तस्राव थांबवण्यासाठी गरजेचा असणारा हा ‘फॅक्टर-७’ जन्मत:च मिहीरच्या शरीरात नाहीये.

हर्नियाची शस्त्रक्रिया तशी सोपीच. पण मिहीरच्या शरीरात ‘फॅक्टर-७’ नसल्या कारणाने ती जोखमीची होती. राज्य सरकारने मिहीरसाठी हा ‘फॅक्टर-७’ खास मागवून घेतला आणि मिहीरची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

‘माय मेडिकल मंत्रा’शी बोलताना ससून रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ आणि सर्जन डॉ. मिनाक्षी भोसले म्हणतात की, “मिहीर दोन महिन्यांचा असताना उजव्या बाजूच्या हर्नियाची एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण, डाव्या बाजूची शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही वेळ घेतला. जखम बरी झाल्यानंतर आम्ही दुसरी शस्त्रक्रिया केली.”

बी. जे. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर सांगतात, ‘फॅक्टर-७’चे डोस मिहीरला देणं एक मोठं आव्हान होतं. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. सोनाली दळवी म्हणतात की, “प्रत्येक चार तासांनंतर आम्ही रक्ताची तपासणी करत होतो. यात रक्त योग्य पद्धतीने थांबत आहे का, याची तपासणी केली जायची. त्या दृष्टीने आम्ही रुग्णाला ‘फॅक्टर-७’ देत होतो. शस्त्रक्रियेदरम्यान आणि नंतर रुग्णाची काळजी घेणं अत्यंत जरुरीचं होतं.”

बी. जे. मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक राजेश कुलकर्णी म्हणतात की, “रक्त थांबवणारा ‘फॅक्टर-७’ शरीरात नसणाऱ्या फक्त २०० व्यक्तींचीच आत्तापर्यंत माहिती आहेत.या लहान मुलाला शस्त्रक्रियेदरम्यान फॅक्टर-७ दिला गेला. सातत्याने डॉक्टरांचं याकडे लक्ष होतं”

मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने मिहीरच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झालाय. “पुण्यातील अनेक रुग्णालयांनी शस्त्रक्रिया होणार नाही, असं आम्हाला लेखी लिहून दिलं होतं. पण, ससूनच्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. याबाबत आम्ही ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया मिहीरची आई वैशाली देशमानेंनी ‘माय मेडिकल मंत्रा’शी बोलताना दिली.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter