डोळ्यांनाही स्ट्रोकचा धोका

ब्रेन स्ट्रोकप्रमाणे आय स्ट्रोकही होऊ शकतो. यामुळे अचानक दृष्टी जाते आणि कायमचं अंधत्व येतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

स्ट्रोक म्हटलं की अनेकांना ब्रेन स्ट्रोकच लक्षात येतो. मात्र तुम्हाला माहिती आहे स्ट्रोक फक्त मेंदूत नाही तर तुमच्या डोळ्यांनाही येऊ शकतो. आय स्ट्रोक ज्याला वैद्यकीय भाषेत रेटिनल आर्टरी ऑक्ल्युजन (retinal artery occlusion) असं म्हणतात.

रक्तवाहिन्यांमार्फत शरीराच्या प्रत्येक भागाला रक्तपुरवठा होतो. जेव्हा या रक्तवाहिन्या आकुंचित पावतात किंवा त्यात रक्ताच्या गुठळ्या होतात, तेव्हा रक्तप्रवाहात अडथळे येतात आणि ज्या भागात रक्तपुरवठा होत नाही त्या भागावर दुष्परिणाम होतो आणि स्ट्रोकची समस्या उद्भवते. नेमकं हेच आय स्ट्रोकमध्येही होतं.

आय स्ट्रोकमध्ये रेटिनातील नसांना हानी पोहोचते. रेटिना हे डोळ्यांच्या आतील पातळ पटल आहे. ज्यावर रक्तवाहिन्या ठराविक पद्धतीनं पसरलेल्या असतात. रेटिना संवेदनशील असून त्यावर प्रतिमा पडल्यानंतर ती माहिती मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपण काय पाहतो आहे त्या आपल्याला कळतं. जेव्हा रेटिनामधील रक्तवाहिन्यांत अडथळे येतात तेव्हा आय स्ट्रोक येतो.

नेत्रतज्ज्ञ डॉ. मंदार कडव यांनी सांगितलं, “आय स्ट्रोक ही दुर्मिळ समस्या आहे. डोळ्यांतील रेटिनाला होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्यास अचानक दृष्टी जाते. तपासणीत रेटिनाला होणारा रक्तपुरवठा होत नसल्याचं दिसतं. यानंतर अनेक पद्धतीने उपचार करता येतात मात्र ते यशस्वी होतीलच असं नाही. ज्या डोळ्यात आय स्ट्रोक आलाय, त्या डोळ्याची दृष्टी कायमची जातेच. शिवाय दुसऱ्या डोळ्यालाही आय स्ट्रोक येण्याची शक्यता टाळता येत नाही.”

आय स्ट्रोक कुणालाही होऊ शकतो. मात्र मधुमेह, ग्लुकोमा, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल, हृदय रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, रक्ताचा दुर्मिळ आजार असलेल्यांना याचा धोका जास्त असतो. आय स्ट्रोक ही अचानक उद्भवणारी समस्या आहे. त्यामुळे तो रोखण्याचा मार्ग नाही. मात्र नमूद केलेले आजार असलेल्यांना याचा धोका टाळता येऊ शकतो. यासाठी मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर नियंत्रण ठेवणं, तसंच ग्लुकोमावर उपचार घेणंही खूप गरजेचं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter