अनियमित रक्तस्राव ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण

कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे स्त्रिया त्यांच्या स्वत:च्या आरोग्याच्या तक्रारींकडे जासत लक्ष देत नाहीत. स्त्रियांमध्ये मासिकपाळीच्या संपूर्ण काळात हार्मोन्सचे बदल घडत असतात. त्यामुळे शरीरातील सुक्ष्म बदलांकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कारण हे होणारे बदल एखादया आजाराचं लक्षण असू शकतं. यासंदर्भातील माहिती दिलीये खारघरच्या मदरहूड रूग्णालयातील प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनु विज यांनी.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अनियमित रक्तस्राव, पाळीच्या वेळी वेदना होणं हे स्त्रियांमध्ये सामान्य दिसून येतं त्यामुळे हे एखाद्या गंभीर आजाराची लक्षणं असू शकतं याचा विचार केला जात नाही. मात्र एण्डोमेट्रिअल कॅन्सरचं निदान झालेल्यांपैकी ९० टक्के स्त्रियांनी या आजाराच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अनियमित रक्तस्राव/मासिक पाळीचा अनुभव घेतलेला असतो, असं अभ्यासातून पुढे आलंय.

प्रत्येक मासिक पाळीतील रक्तस्रावाची पद्धत समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. दैनंदिन ताण, आहारविषयक सवयी, शारीरिक हालचाल जास्त प्रमाणात होणं किंवा न होणं यामुळे बदल घडू शकतात. सातत्याने होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.

गर्भाशयाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे पायात गोळे येणं किंवा वेदना मासिक पाळीदरम्यान साहजिक असल्या तरीही प्रचंड आणि सतत वेदना होत असल्यास काही गंभीर कारण आहे का हे तपासून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे, भूक न लागणे, थकवा ही एण्डोमेड्रिअल कॅन्सरची लक्षणं देखील दुर्लक्षित राहतात.

भारतीय स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता/अॅनिमियाचे प्रमाण बरंच आहे. त्यामुळे थकवा येतो. त्यामुळेही या कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यावर होऊ शकत नाही. स्त्रियांमध्ये दिसून येणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांची अन्य काही लक्षणं म्हणजे:

  • पायावर सूज
  • फुगलेलं ओटीपोट
  • सततचं अपचन
  • मूत्राशयावर दाब जाणवणं
  • सतत लघवीला जावं लागणं

स्त्रियांना एण्डोमेट्रिअल कॅन्सरच्या लक्षणांविषयी माहिती देणं हे सर्वांत महत्त्वाचं आहे. कॅन्सरचा हा प्रकार गर्भाशयाच्या अस्तरापासून सुरू होतो. हा कॅन्सर सहसा रजोनिवृत्तीनंतर किंवा त्यादरम्यान होत असला, तरी तरुण स्त्रियांमध्येही त्याचे निदान होऊ शकतं. मासिक पाळीशी संबंध नसलेला योनीमार्गातून होणारा रक्तस्राव याचं लक्षणं आहे. एण्डोमेट्रिअल कॅन्सरच्या ४० टक्के रुग्णांमध्ये स्थूलत्व, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असतो.

या कॅन्सरचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर झाले, तर यातून बरं होण्याचं प्रमाण ८० टक्के आहे. हिस्टरेक्टॉमी (म्हणजेच गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) आणि त्याबरोबरच अंडनलिका (फेलोपिअन ट्युब्ज) आणि अंडाशय (ओव्हरीज) काढून टाकणं हा एण्डोमेट्रिअल कॅन्सरवरील उपचारांचा प्रमुख भाग आहे. कॅन्सर पुढील टप्प्यात पोहोचून अन्य ऊती/अवयवांमध्ये पसरला असेल, तर किमोथेरपी, रेडिएशन यांसारखे उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो.

विचित्र रक्तस्राव किंवा वेदनादायी मासिक पाळी हे प्रत्येकवेळी कॅन्सरचंच लक्षण असेल असं नाही. मात्र, ही लक्षणं दीर्घकाळ जाणवत राहिल्यास (२ आठवड्यांहून अधिक काळ) त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter