…अशी करा अॅसिडीटी दूर

अॅसिडीटीचा त्रास हा त्रास आजकाल सर्वसामान्य झालाय. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा त्रास उद्भवू शकतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अॅसिडीटीवर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.

0
743
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अॅसिडीटी झाल्यावर आपण अस्वस्थ होतो. कधी एकदा या अॅसिडीटीपासून सुटका होईल असं आपल्याला वाटतं. जागरण करणं, सतत बाहेरचं पदार्थ खाणं, अति थंड पदार्थ खाणं किंवा पोटाशी संबंधित काही आजार असल्यास देखील अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.

अॅसिडीटी ही पचनप्रणालीसंबंधीची समस्या आहे. यामध्ये शक्यतो छातीत जळजळणं किंवा गळ्य़ाकडे जळजळणं अशा समस्या उद्भवतात. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अॅसिडीटीवर घरगुती औषधोपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर आहे.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना झेन रूग्णालयातील पोटविकारतज्ज्ञ डॉ. रॉय पाटणकर म्हणाले की, “सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कामाच्या व जबाबदारीच्या ओझ्याखाली आहे. अॅसिडीटीची लक्षणं जीवनशैलीत केवळ व्यत्यय आणतात. त्यामुळे साधारणतः मोठा जीवघेणा धोका उद्भवत नसल्याने लोकं याकडे दुर्लक्ष करतात. तेलकट आणि मसालेदार पदार्थ, कॅफेन आणि चॉकलेटचा वापर बंद केला पाहिजे. नियमित चालणं, सायकलिंग, योगाभ्यास आणि पोहणं यामुळे अॅसिडीटीपासून मुक्तता मिळवता येऊ शकते”

अॅसिडीटी लक्षणं

 • पोटात जळजळणं
 • घशात जळजळणं
 • मळमळणं
 • अपचन
 • अति प्रमाणात ढेकर येणं
 • डोक्याच्या एका बाजूला दुखणं
 • डोळ्यांची आग होणं
 • उलटी होणं
 • कर्कश आवाज सहन न होणं

अॅसिडीटी झाल्यास काय करालं

 • घरगुती उपाय न करता प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
 • अॅसिडीटीकडे दुर्लक्ष करू नका
 • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोकेदुखीची औषधे घेऊ नका
 • जंक फूड किंवा बाहरचे उघड्यावरील पदार्थ खाणं टाळा
 • धूम्रपान- मद्यपान करणं टाळा
 • मसालेदार पदार्थ खाणं टाळा
 • कॉफी पिऊ नका

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बदलत्या जीवनशैलीमुळे, प्रमाणापेक्षा अधिक खाण्यामुळे तसंच वाढत्या अॅसिडिटीमुळे डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत याला गॅस्ट्रिक मायग्रेन असं म्हणतात. विशेषतः १२ तास कॉम्प्यूटरवर काम करत राहिल्यानेही डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. यासोबतचं अॅसिडिटीमुळे अर्धशिशी होण्याचे प्रमाण १५ ते ४० वयोगटात सर्वाधिक आढळून येतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter