डिजीटल युगात हरवलं मुलांचं हस्ताक्षर

हस्ताक्षर म्हणजे वहीवर लिहिलेली फक्त अक्षरं नाही, तर हस्ताक्षर म्हणजे आपल्या भावना असतात. पण आजच्या डिजीटल युगात हा अनुभवच हरवत चाललाय. हल्ली मुलांना वहीवर लिहिणं आवडतंच नाही.

डिजीटल युगात हरवलं मुलांचं हस्ताक्षर
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

‘सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना’ हा वाक्प्रचार सर्वांनीच ऐकला असेल. मी काय किंवा तुम्ही काय, आपण सर्वच लहान असताना शाळेत शिक्षक नेहमीच सुंदर हस्ताक्षरावर भर द्यायचे. हस्ताक्षराच्या बाबतीत लहान-सहान गोष्टी आपल्याला सांगायचे. अक्षर कसं वळणदार यायला पाहिजे याबाबत सांगायचे. यासाठी काहीवेळा सुंदर अक्षर गिरवणारी वही किंवा पाटी असायची, ज्यावरील वळणदार अक्षरं शिक्षक गिरवायला सांगायचे. पण हे प्रत्येक मुलावर अवलंबून असतं की, त्याचं अक्षर कसं असेल.

मला अनेकदा शाळांमध्ये मनोचिकित्सक म्हणून बोलवले जाते. माझ्याकडे अशा मुलांना पाठवलं जातं, ज्यांना लिहायला आवडत नाही. खरं सांगायचं तर पूर्वीच्या काळातील मुलांना टॅबलेट, स्मार्टफोन हाताळायची सवय नव्हती. त्यांना शाळेत जाईपर्यंत टायपिंगबाबत काहीच माहिती नव्हती. पण आजकालची मुलं स्मार्ट गॅजेट्ससोबतच वाढत आहेत. त्यातच बऱ्याचशा गोष्टी या आज इंटरनेटमुळे कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे मुलांना २४ तास यावरच संभाषण करायची, टाईप करायची सवय असते. अशावेळी मुलांना हाताने लिहायला आवडत नाही. त्यांना पेन्सिल पकडण्यापेक्षा जॉयस्टिक हातात पकडणे अधिक आवडते.

मी शाळेत भेटत असलेल्या बऱ्याच मुलांचे हस्ताक्षर स्वच्छ आणि छान नसतेच. माझ्यावेळेस असे नव्हते. शाळांमध्येच हस्तलेखन प्रशिक्षण दिले जात होते. दिवसाला एक पान शुद्धलेखन लिहून आणण्यास सांगितलं जायचं. पण आता असं काही होत नाही. आता तर कित्येक मुलांना हातात पेन किंवा पेन्सिल कशी धरायची हेही माहीत नसतं. मी शाळेत असताना मोठ-मोठी उत्तरं माझ्या हाताने लिहिली आहेत, वहीची अनेक पानं लिहून भरली आहेत. पण हल्ली मुलं टॅबलेट किंवा स्मार्टफोनवर बोटं फिरवून लिहितात. पण यामुळे अनेकदा मुलांची बोटं दुखतात. व्हिडिओ गेम खेळतानाही असाच त्रास मुलांना जाणवतो.

सुंदर हस्ताक्षर ही एक कला आहे. पण आज ही कला संपत चालली आहे. लवकरच जेव्हा सर्व डिजिटल होईल तेव्हा तर कोणी लिहिणारच नाही. एक दिवस असा येईल की, मुलं शाळेतच लॅपटॉप वापरतील. गृहपाठ मुलांना दाखवायला नाही, ई-मेलवर पाठवायला सांगितला जाईल. मुलांची परीक्षाही ऑनलाईन घेतली जाईल.

पण यावर मात करायची असेल तर काही पावलं तातडीने उचलली पाहिजेत. मुलांना चांगल्या आणि अचूक हस्ताक्षरासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना सुंदर हस्ताक्षरासाठी बक्षीसही दिली पाहिजेत. हस्ताक्षर त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाढीसाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

हस्ताक्षर वैयक्तिक अभिव्यक्तीचे सर्वात चांगले साधन आहे. ते तुम्हाला व्यक्त व्हायला मदत करतं. तुम्ही तुमच्या भावना लिहू शकता. आणि लिहिलेल्या त्या भावना हस्ताक्षरामुळेच अनुभवता येतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter