काही काळासाठी ‘डिजीटल संन्यास’ घ्याल, तर मजेत राहाल

फोन, लॅपटॉप, संगणक आणि इतर डिजीटल उपकरणांशिवाय राहणं आता अशक्यप्राय होऊन बसलंय. पण याचा खोलवर परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो. त्यामुळे काही काळ ‘डिजीटल संन्यास’ घेतल्यास परत प्रफुल्लीत आयुष्य जगायला मदत होते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअप हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेत. मोबाईलपासून फक्त एका तासासाठी लांब राहणंही अशक्यप्राय होऊन बसलंय. या डिजीटल जगाशी आपलं जगणं अशाप्रकारे जोडून गेलंय. मात्र या डिजीटल जगाचा परिणाम आपल्या खऱ्या आयुष्यावर होतोय. सारखा मोबाईल वापरण्याचा ताण मनावर आणि शरिरावरही येतो. यामुळे ठरवून काही वेळ डिजीटल विश्वापासून लांब राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ हरिश शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, डिजीटल विश्वापासून काही काळ लांब राहिल्यास मन शांत होतं आणि कल्पनाशक्ती वाढते. याशिवाय काही शारीरिक आजारांपासूनही दूर राहता येते. “सतत फोन आणि इतर साधनांचा वापर केल्यामुळे, अनेक शारीरिक व्याधीही जडतात. मानदुखी, डोकेदुखी, झोप न येणं आणि उच्च रक्तदाबासारखे आजार संभवतात. याशिवाय लक्ष केंद्रित करताना अडचणी निर्माण होणे, सतत थकवा येणे, चिडचिड होणे, निराश होणे यांसारख्या मानसिक आजारांचा विळखाही पडू शकतो.” डॉ शेट्टी.

शारीरिक थकवा घालवण्यासाठी जसा आपण आराम करतो तसा मानसिक ताण घालवण्यासाठी डिजीटल साधनांपासून काही काळ लांब राहणं गरजेचं आहे. “हल्ली या उपकरणांची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, त्यांच्यापासून थोड्यावेळ लांब राहावं लागल्यास आपली चिडचिड होते. फोनची बॅटरी जरी कमी असली तरी सुद्धा आपण अस्वस्थ होतो. या उपकरणांमुळे माणसांमधला प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यासोबतच लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही कमी झालीये. कामाच्या ठिकाणीही या उपकरणांमुळे लक्ष विचलित होतं. याचा परिणाम नातेसंबंधांवर आणि कामावर होतो,” असं मत, केईम रुग्णालयात सहाय्यक प्रोफेसर आणि मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या डॉ. हीना मर्चंट यांनी व्यक्त केलं.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या युवा विभागाचे अध्यक्ष आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ सागर मुंदडा यांनीही डिजीटल उपकरणांपासून काही काळ लांब राहण्याची गरज व्यक्त केली. “काही काळासाठी जर फोनपासून ब्रेक घेतला तर, त्याचे फायदे लगेचच दिसून येतात. चिडचिड कमी होते, लक्ष विचलित होत नाही यासोबतच स्मरणशक्ती वाढते.”

डिजीटल विश्वात सतत रमण्याचे दुष्परिणाम लोकांनाही जाणवू लागलेत आणि यामुळे काही काळ ‘डिजीटल संन्यास’ घेण्याकडे त्यांचा वाढू लागल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. “अनेक जण मला विचारतात की, डिजीटल जगापासून लांब कसं राहायचं? माझं हेच म्हणणं आहे की, ही उपकरणं वापरताना त्यामध्ये रमू नका. त्यांचा मर्यादित वापर करा आणि इतर लोकांशी प्रत्यक्षपणे संवाद साधण्यावर भर द्या. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहण्याचा हाच फॉर्म्यूला आहे.” डॉ. हरीश शेट्टी.

स्वत:ला मोबाईल आणि लॅपटॉप यांसारख्या उपकरणांपासून काही काळ लांब ठेवण्याचा प्रयोग समिधा अजय नार्वेकर हिनं केला. ती यांचा प्रचंड प्रमाणात वापर करायची. या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम लगेचच तिला दिसू लागले. माय मेडिकल मंत्राशी बोलताना ती म्हणाली की, “मला झोपताना फोन वापरण्याची सवय होती. आता मी स्वत:वरच निर्बंध घातले आहेत. झोपताना मी फोन लॉकरमध्ये ठेवते आणि शांतपणे झोपते.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter