डेंग्यूवर भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं आयुर्वेदीक औषध

भारतीय शास्त्रज्ञांनी डेंग्यूवर मात करणाऱ्या आयुर्वेदीक औषधाचा शोध लावलाय. संशोधकांचा दावा आहे की हे डेंग्यूवर उपलब्ध असणारं जगभरातील पहिलं औषध आहे. पुढच्या वर्षी डेंग्युवरील हे औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

डेंग्यू या आजारावर मात करण्यासाठी कोणताही ठोस उपचार नाही. डेंग्यू झाला की डॉक्टर रुग्णाला आराम, जास्तीत-जास्त द्रव पदार्थांचं सेवन आणि चांगला आहार घेण्यास सांगतात. पण, पुढील वर्षात डेंग्यूवर औषध उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे औषध आयुुर्वेदीक असणार आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी या औषधाचा शोध लावलाय.

सेंट्रल काऊंसिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदीक सायन्सेस आणि भारतीय आयुर्विज्ञान अनुुसंधान परिषद यांनी डेंग्यूवरील हे औषध तयार केलंय. डेंग्यूवरील या आयुर्वेदीक औषधांच्या दोन चाचण्या झाल्या असून संशोधकांनी या औषधाची सुरक्षा चाचणीही केलीये.

सेंट्रल काउंसिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदीक सायन्सेसचे संचालक प्रो. वैद्य के.एस.धिमान यांच्या माहितीनुुसार, सध्या या औषधावर बेळगाव आणि कोलारच्या वैद्यकीय विद्यापीठात अभ्यास सुरू आहे. सध्या या औषधाचा वापर माणसांवर करण्यात येतोय. ज्याच्या माध्यमातून या औषधाची चाचणी सुरू करण्यात आलीये.

प्रो. धिमान यांच्या म्हणण्याप्रमाणे, डेंग्यूवरील जगातील पहिलं औषध विविध औषध वनस्पतींपासून बनवण्यात आलंय, ज्यांचा आयुर्वेदात वापर करण्यात येतो.

भारतात दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. डेंग्यूवर सध्या कोणतीही लस किंवा औषध नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आयुर्वेदीक औषधांबाबत संशोधन सुरू केलं होतं.

प्रो. धिमान यांच्या माहितीनुसार, “डेंग्यूवरील पहिलं औषध बनवण्यासाठी २०१५ मध्ये सुरूवात करण्यात आली होती. गुडगावच्या मेदांता रुग्णालयात, बेळगाव आणि कोलारच्या वैद्यकीय विद्यापीठात याबाबत संशोधन सुरू करण्यात आलं होतं. गेल्यावर्षी जून महिन्यात डेंग्यूवरील हे औषध तयार झालं. प्राथमिक तपासण्या आणि चाचण्यांमधून हे औषध सुरक्षित असल्याची माहिती मिळाली.”

तर माय मेडिकल मंत्राशी बोलताना केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले होते की, “हृदयरोग, मधुमेह, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या नॉन-कम्युनिकेबल आजारांवर प्रतिबंध करण्यासाठी आम्ही एक इंटीग्रेटीव्ह प्रोजेक्ट सुरू केलाय. प्रत्येक राज्यातून एक जिल्हा, अशी १० जिल्ह्यांची निवड केलीये. तर  डेंग्यूबाबत संशोधन सुरू असून आम्ही औषध देणं सुरू केलंय.”

प्राथमिक तपासणीत ९० रुग्णांना हे औषध द्रव पदार्थांच्या माध्यमात देण्यात आलं होतं. पण, सध्या या औषधांच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जातायत.

डेंग्यू हा डासांपासून होणारा आजार आहे. या डासांची पैदास चांगल्या, स्वच्छ पाण्यामध्ये होते. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या ही या आजाराची काही प्रमुख लक्षणं आहेत. डेंग्यूत रुग्णाच्या अंगातील प्लेटलेट कमी होतात. त्यामुळे रुग्णाला भयंकर अशक्तपणा येतो. योग्य आणि वेळीच उपचार मिळाले नाही, तर डेंग्यू जीवघेणा ठरतो.

नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोलच्या माहितीनुसार,

  • भारतात २०१७ साली १,५७,२२० इतके डेंग्यूचे रूग्ण आढळले होते आणि यामुळे २५० जणांचा मृत्यू झाला होता
  • तर २०१६ साली १,२९,१६६ इतकी डेंग्यूच्या रूग्णांची नोंद होती आणि यामुळे २४५ रूग्णांचा मृत्यू झाला होता
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter