सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका!

ऋतू बदलला की सर्दी-खोकल्याचा त्रास बऱ्याच जणांना जाणवू लागतो. मात्र या सर्दी-खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिलं जात नाही. पण सर्दी खोकल्याकडे दुर्लक्ष करणे कधी-कधी घातक ठरू शकते.

0
160
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

वातावरणात थोडा जरी बदल झाला की अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरु होतो. हे आजार सामान्य असल्याने याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. इतकंच नाहीतर सर्दीमुळे डोकेदुखी होत असल्याने काही लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच औषध विक्रेत्यांकडून औषध घेतात. पण यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सर्दी खोकल्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. नाक, फुफ्फुस, घसा आणि कान यांचा परस्परसंबंध असल्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्याकडे लक्ष न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना केईएम रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. निलम साठे म्हणाल्या की, “वारंवार होणाऱ्या सर्दीकडे दुर्लक्ष केल्यास अनेक आजार होऊ शकतात. पण सर्दी नेमकी कशामुळे होते हे जाणून घेतले पाहिजे. सर्दीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अलर्जिक सर्दी आणि जंतूसंसर्गामुळे होणारी सर्दी. इतकंच नाहीतर पावसाळ्यात व हिवाळ्यात सर्दीचा त्रास अनेकांना होतो. काही खाण्याने किंवा हवेतील धुळी कणांमुळे अलर्जिक सर्दी होऊ शकते. अशावेळी नेहमी अलर्जी कशामुळे आहे हे तपासून पाहण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची चाचणी करावी लागते.”

डॉ. साठे पुढे म्हणतात की, “रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्याना संसर्गामुळे सर्दीची लागण होऊ शकते. अशावेळी घरगुती उपाय करत न बसता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्टेराईटची औषध सुरू केल्यानंतर सर्दी बरी करता येऊ शकते. इतकंच नाहीतर लहान मुलं आणि वृद्धांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना याचा त्रास सर्वांधिक होतो. यामध्ये फुफ्फुस आणि श्वसननलिकेचे आजारही होऊ शकतात.”

लक्षणं

  • नाकातून सतत पाणी येणे
  • नाक लाल होणे
  • डोके दुखणे
  • अंग दुखणे

काय उपाय कराल?

  • गरम पाणी प्यावे
  • उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात ‘क’ जीवनसत्त्वाचा समावेश करावा
  • एअर कंडिशनर नेहमी स्वच्छ करून घ्यावा
  • घशाला आराम देण्यासाठी गरम दुधाचे प्यावं
  • गर्दीच्या ठिकाणी फिरणं टाळावं

यासंदर्भात बोलताना जनरल फिजिशियन डॉ. गोविंद केवट म्हणाले की, “सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी व खोकल्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. अनेक विषाणूंच्या संसर्गामुळे सर्दी होते. हे विषाणू व्यक्तींच्या श्वसनामार्फत मेंदूपर्यंत जातात. त्याचा परिणाम मेंदूच्या पडद्यावर होऊ शकतो. त्यामुळे सर्दी झाल्यावर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter