‘दूषित पाणी, अस्वच्छता जगभरातील गंभीर समस्या’

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात डायरियामुळे पाच वर्षांखालील ३,६१,००० मुलांना प्राण गमवावे लागलेत. जगभरात डायरियामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ४२ टक्के मृत्यू हे भारत आणि नायजेरियात होतात. जगभरात २.१ अब्ज लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टमध्ये देण्यात आलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि राहण्याच्या जागेची स्वच्छता, या दोन गोष्टी लोकांसाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत. अस्वच्छ किंवा दूषित पाण्यामुळे अनेक आजार होतात, ज्यात डायरियाचं (अतिसार) प्रमाण सर्वात जास्त आहे.

जून २०१७मध्ये जगभरात दूषित पाण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्वेक्षण करण्यात आलं होतं. ज्यात धक्कादायक माहिती समोर आलीये. तर, जगभरात डायरियामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ४२ टक्के मृत्यू हे भारत आणि नायजेरियात होतात, अशी माहिती लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये देण्यात आलीये.

जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात दूषित पाण्याबाबत एक रिपोर्ट जाहीर केला. ज्यात जगभरात २.१ अब्ज लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही, तर ८४४ दशलक्ष लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली होती. याचा अर्थ असा की, जगभरात दर १० माणसांमधल्या ३ व्यक्तींना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात डायरियामुळे पाच वर्षांखालील ३,६१,००० मुलांना आपले प्राण गमवावे लागलेत. अस्वच्छता, पिण्यासाठी मिळणारं दूषित पाणी, दूषित पाण्यापासून होणारे रोग यामुळे मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

मुंबईतील पिण्याच्या पाण्याबाबत प्रजा फाऊंडेशन या सामाजिक संघटनेने एक श्वेतपत्रिका जाहीर केली होती. प्रजा फाऊंडेशनच्या मिलिंद म्हस्के यांच्या माहितीनुसार, “मुंबईत चार वर्षांखालच्या ३२.९ टक्के मुलांचा मृत्यू हा डायरियामुळे झाला.”

चेंबूरच्या झेन रुग्णालयाचे डॉ. विक्रांत शहा यांच्या म्हणण्याप्रमाणे, “डायरिया दूषित पाण्यातून पसरणाऱ्या जीवाणूंपासून होतो. यासाठी हात स्वच्छ धुवावेत, पाणी उकळून प्यावं आणि महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावरचं अन्न खाऊ नये.”

या रिपोर्टमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. तेद्रोस म्हणतात की, “पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि राहण्याच्या जागेची स्वच्छता हे फक्त श्रीमंतांपुरतं मर्यादित असू नये. स्वच्छ पाणी आणि स्वच्छता देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळाली पाहिजे.”

युनिसेफचे कार्यकारी संचालक एन्थोनी लाके यांच्या म्हणण्याप्रमाणे, “स्वच्छ पाणी, परिसराची स्वच्छता मिळणं हा प्रत्येक लहान मुलाचा अधिकार आहे. हा मुलांच्या आरोग्याशी निगडित असा विषय आहे. लहान मुलांचं आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर या गोष्टी त्यांना मिळायलाच हव्यात.”

मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. गौतम भन्साळी म्हणतात की, “भारतात दूषित पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे. दूषित पाण्यामुळे डायरिया, कावीळ यांच्यासारखे आजार होतात. यावर वेळीच उपचार न केल्यास लोकांचा जीव जाऊ शकतो. ”

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टची वैशिष्ट्यं 

  • अनेक देशात पिण्याचं पाणी दूषित आढळून आलं.
  • ज्या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे त्या देशात मुलांना या प्राथमिक सुविधा मिळत नाहीत.
  • शहरी आणि ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत खूप अंतर आहे. १६१ लोक तलाव, नदी आणि धरणांमधले पाणी पितात ज्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केलेली नसते. यातील १५० लोक ग्रामीण भागात राहतात.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter