ग्रामीण भागात डॉक्टर नसल्यास १०४ क्रमांकावर तक्रार करा

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि उपजिल्हा रूग्णालयात अनेकवेळा डॉक्टरांची गैरहजेरी पाहायला मिळते. अशावेळी एखाद्या रूग्णावर आपात्कालीन स्तिथी ओढावल्यास रूग्णाचे उपचारांविना अतोनात हाल होताना पाहायला मिळतात. याची दखल घेत आरोग्य विभागाकडून १०४ हा टोल फ्री नंबर सुरु करण्यात आलाय. यामार्फत वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यास रुग्णाच्या नातेवाईकांना आरोग्य सल्ला संपर्क केंद्राच्या या १०४ क्रमांकांवर तक्रार करता येणारे.

याविषयी राज्याचे आरोग्यमंत्री दिपक सावंत म्हणाले की, “वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतील तर, रुग्णाच्या नातेवाईकांनी १०४ क्रमांकांवर तक्रार करावी. केंद्राच्या माध्यमातून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना त्‍वरीत रुग्णालयात उपस्थित राहण्याबाबत कळवले जाईल. येत्या १ नोव्हेंबरपासून  राज्यभर ही सुविधा होणार आहे”

आरोग्‍य सल्‍ला संपर्क केंद्रात तक्रार दाखल केल्यानंतर रुग्‍णाच्या नातेवाईकांना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याबाबत माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णावर उपचार करण्याच्या सूचना देण्यात येतील. जर वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क न झाला नाही तर तालुका आरोग्‍य अधिकाऱ्यास आणि त्‍यानंतर जिल्‍हा आरोग्‍य अधिकाऱ्यास सदर तक्रारीचे निवारण करण्‍याबाबत कळवण्‍यात येईल.

“आपत्‍कालीन परिस्थितीत पहिला अर्धा तास हा फार महत्त्वाचा असतो. या कालावधीत रुग्‍णांवर उपचार झाल्‍यास त्यांना होणारा त्रास आणि मृत्‍यूदर कमी होण्यास मदत होईल. शिवाय यामुळे रुग्‍णांचा सार्वजनिक आरोग्‍य सेवेवरचा विश्‍वास दृढ  होईल”, असं डॉ. सावंत यांनी सांगितलं

या सुविधेमुळे वैद्यकीय अधिकारी जवळच उपलब्‍ध असल्‍यास त्‍वरीत उपचार करण्‍यात येईल. शिवाय ज्‍या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्‍ध नसल्‍यास रुग्‍णाला वैद्यकीय अधिकारी उपलब्‍ध असलेल्‍या नजीकच्‍या आरोग्‍य केंद्रात पाठवण्यात येईल.

ग्रामीण व उपजिल्‍हा रुग्‍णालयासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्‍ध नसल्‍यास संबंधित रुग्‍णालयाच्‍या वैद्यकीय अधीक्षकांस संपर्क करण्‍यात येईल आणि जिल्‍हास्‍तरावरील अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांना तक्रारीचे निवारण करण्‍याबाबत कळवण्‍यात येईल.

डॉ. सावंत पुढे म्हणाले की, “ज्‍या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कोणतीही पूर्वसुचना न देता अनधिकृतपणे गैरहजर असेल आणि त्याच्यामुळे आपात्कालीन परिस्थितीत रुग्‍णाला वेळेत उपचार न मिळाल्‍यास त्यांच्यावर कारवाई करण्‍यात येईल.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)