होमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु

'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा'कडून होमिओपॅथी डॉक्टरांसाठी आधुनिक औषधशास्त्र या ब्रीजकोर्सच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात कऱण्यात आलीये. यानुसार राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टर आता यामध्ये अर्ज करू शकतात. होमिओपॅथी डॉक्टरांना ब्रीजकोर्स नको यासाठी अॅलोपॅथी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली होती.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नाशिकच्या ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’कडून होमिओपॅथी डॉक्टरांसाठी मॉर्डन फार्माकोलॉजी म्हणजेच आधुनिक औषधशास्त्र या ब्रीजकोर्सच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात कऱण्यात आलीये. यानुसार राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टर आता यामध्ये अर्ज करू शकतात.

याबाबत विद्यापीठाचे माननीय कुलगुरु दिलीप म्हैसकर यांच्या सांगण्यानुसार, “आधुनिक औषधशास्त्राच्या अभ्याक्रमासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियमाअंतर्गत महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडे नोंदणी असणं अनिवार्य आहे. शिवाय या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवाराने विद्यापीठाकडे ऑनलाईन अर्ज देणं करणं बंधनकारक असेल.”

तर याविषयी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेने दिलेल्या निर्णयानुसार प्रथम चाळीस हजार नोंदणी केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना 2018-2019 या वर्षांत प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या अभ्यासक्रमास राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टर प्रवेशासाठी पात्र असतील. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे.

या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक उमेदवाराने त्याच्या अर्जामध्ये कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त चोवीस महाविद्यालयांची नावं देणं बंधनकारक आहे. त्यानंतर मात्र त्यामध्ये बदल करता येणार नाही. सध्या राज्यातील चोवीस महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आलीये.

‘आधुनिक औषधशास्त्र’ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंबंधीची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आलीये.

होमिओपॅथीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस कऱण्यासाठी ब्रीजकोर्स नको या मुद्द्याचा नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकात देखील समावेश करण्यात आलेला. या ब्रीजकोर्स सुरु कऱण्याबाबत डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने नाराजी व्यक्त केली होती. मात्र केंद्र सरकारने ब्रीज कोर्स सुरु कऱण्याचा निर्णय हा राज्य सरकारवर सोपवला होता.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter