जाणून घ्या, स्तनपानाचे फायदे

स्तनपानामुळे मुलांबरोबरच त्याच्या आईलाही फायदा होतोच. तसंच स्तनपानामुळे मातेच्या कॅलरीज कमी होण्यास मदत होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्तनपान दिल्यामुळे मातेचं स्तनांच्या कर्करोगापासून रक्षण होतं. स्तनपानाविषयी अधिक माहिती देतायत वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, हिरानंदानी रुग्णालय, वाशी- फोर्टीस समूहातील रुग्णालयाच्या डॉक्टर वंदना गावडी.

0
516
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नवजात बाळासाठी स्तनपान अत्यावश्यक आहे, आईचे दूध हा मुलाच्या वाढीसाठी व विकासाठी पोषणाचा सर्वोत्तम स्रोत आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र आईच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील स्तनपान गरजेचं असतं हे अनेकांना अजून माहीत नाही.

स्तनपानाची यशस्वीरित्या सुरुवात करणं आणि ते सातत्यानं बाळाला पाजत राहणं हे नवमातेसाठी खूपच महत्त्वाचं ठरतं. तर या विषयातील अभ्यासकांच्या सांगण्यानुसार, नैसर्गिकरित्या योनीमार्गाद्वारे बाळंतपण झाले असेल तर, लवकरात लवकर म्हणजे बाळाच्या जन्मानंतर काही मिनिटांतच त्याला स्तनपानासाठी घेतले पाहिजे. दीर्घ बाळंतवेणा सहन केल्यानंतर बाळाचा स्पर्श मातेला शांत करतो. या स्तनपानामुळे मिळणारा आराम मातेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.

नवजात अर्भकासाठी स्तनपान सुखावह असते. कारण, बाळाला आईच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. त्यापूर्वीचे नऊ महिने ते हा आवाज ऐकत असतं. अलीकडे सिझेरियनद्वारे झालेल्या बाळंतपणानंतरही अर्भकाला त्वरित स्तनपान दिले जाते. आईला पाठीच्या कण्यातून भूल दिलेली असेल, तर अगदी शस्त्रक्रिया कक्षातच परिचारिका व भूलतज्ज्ञांच्या मदतीने स्तनपान सुरू करता येते.

डॉ. वंदना गावडी
डॉ. वंदना गावडी

बाळाला स्तनपान दिले जात असेल, तर आईला बाळंतपणानंतर नैराश्य येण्याची शक्यता कमी होते, ताणही कमी होतो, असे निरीक्षणातून आढळले आहे. हार्मोन्समध्ये होणारे बदल, अपुरी झोप, थकवा आणि टाक्यांमुळे होणा-या वेदना या कारणांनी येणारे नैराश्य, बाळाच्या जन्मानंतर पहिल्या २४ तासांत त्याला स्तनपान देणा-या मातांमध्ये कमी प्रमाणात आढळतं. स्तनपानामुळे गर्भाशय आकुंचन पावून आपल्या मूळ जागी, ओटीपोटात परत येण्यासही मदत होते. गर्भाशय चांगले आकुंचन पावल्यास रक्तस्राव कमी होतो आणि यामुळे माता बाळंतपणाच्या थकव्यातून लवकर बाहेर येते.

स्तनपान सुरू असताना तिने चांगला आहार घेतल्यास बाळाचे पोषण चांगले होते. बाळाचे स्तनपान सुरू असताना, आईही आपोआप तिच्या आहाराची काळजी घेते. स्तनपानामुळे मातेच्या कॅलरीज कमी होण्यास मदत होते आणि गरोदरपणात वाढलेलं वजन लवकर कमी होतं. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्तनपान दिल्यामुळे मातेचं स्तनांच्या कर्करोगापासून रक्षण होते हे फार कमी लोकांना माहीत आहे.

स्तनपान हे नैसर्गिक गर्भनिरोधक मानलं जातं. स्तनपान सुरू असेपर्यंत मासिक पाळी पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी असते आणि त्यामुळे गर्भधारणा नैसर्गिकरित्या टाळली जाते. या सगळ्यांतून हेच सिद्ध होते की, आई आणि बाळाच्या भावनिक, शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी स्तनपान अत्यंत आवश्यक आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter