आईचं ‘दूध’ वाढवणारे पदार्थ

जन्मानंतर बाळ पुढील सहा महिने फक्त आईचे दूध पिते. हे दूध कसे असावे? त्यात काही दोष आल्यास काय करावे. जाणून घ्या.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आईचे दूध म्हणजेच स्तन्य हे बाळासाठी पूर्ण आहार असल्याने स्तन्यात कोणतेही दोष असता कामा नये. आयुर्वेदाने शुद्ध स्तन्याची जी लक्षणे सांगितली आहेत त्यानुसार स्तन्य स्वच्छ, पातळ व शीतल असावे. त्याचा रंग शंखासारखा सफेद असावा. चव गोड असावी. काचेच्या ग्लासात पाणी घेऊन त्यात स्तन्याचे ४-५ थेंब टाकले असता ते त्यात सहज मिसळले पाहिजे. असे स्तन्य बाळासाठी पोषक असते.

तथापि आधुनिक जीवनशैलीतील धावपळ, राग, अतीव दुःख, चिंता, वात्सल्याचा अभाव, उपवास, अतिव्यायाम यामुळे स्तन्य कमी होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. आहारात थोडे बदल केल्यास स्तन्यशुद्धी होण्यास मदत होऊ शकते.

जसे की, जिरे, मेथ्या, कुळीथ, हळद, हिंग हे घटक स्तन्य शुद्ध राहायला तसेच स्तन्य वाढायला मदत करणारे असल्याने भाजी, आमटीच्या फोडणीत त्याचा समावेश करावा. ओवा, बाळंतशेप, तीळ यांपासून बनवलेली सुपारी खाण्याने स्तन्य शुद्ध राहायला मदत मिळते.

दशमूलारिष्ट, कुमारी आसव यासारखी औषधे तसेच दशमूळ, हिरडा आणि ज्येष्ठमध यांचा लेप स्तनांवर लावल्याने स्तन्यशुद्धी होते.

दुग्धवर्धक आहार व औषधे  

आयुर्वेदाने स्तनपानावर विशेष भर देत गरोदरपणापासूनच शतावरी, अश्वगंधा, ज्येष्ठमध, नागरमोथा, अहळीव, डिंक, सुंठ, मेथी इ. दुग्धवर्धक घटकांचा आहारात आवर्जून समावेश करण्यास सुचवले आहे. दूध व तुपानेही स्तन्य वृद्धीस मदत मिळते. शिंगाड्याचा पिठाचा गूळ घालून केलेला शिरा खाण्याने स्तन्य वाढायला मदत मिळते. बाळाच्या सतत स्तन चोखण्याने सुद्धा आईला पुरेसे दूध सुटते. बाळाचा स्पर्श आणि बाळाप्रती वात्सल्य या गोष्टीही त्यात अधिक भर घालत असतात. स्तनांना तेलाने हलका मसाज केल्यानेही स्तन्यवृद्धी होते.

दूध वाढण्यासाठी पाव चमचा पिंपळी, पाव चमचा सुंठ, पाव चमचा हिरडा, अर्धा चमचा गूळ व थोडे तूप हे मिश्रण दुधासह घ्यावे. वैद्यांच्या सल्ल्याने ‘लॅक्टोसन’सारखी स्तन्यवर्धक औषधे घ्यावीत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे दूध माझ्या बाळाचे पोषण करणारे आहे, म्हणून मला स्तनपान करायचे आहे ही भावना प्रत्येक मातेने मनाशी बाळगली तरी तिच्या बाळाला कधीही दूध कमी पडणार नाही. ते बाळ नेहमी आनंदी आणि हसरे-खेळते राहील.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter