मुंबई – पालिका शाळेतील शिक्षकांना मानसिक आजाराचे धडे

मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मानसिक समस्येतून बाहेर काढण्यासाठी समुपदेशक नेमले जाणार आहेत. अशा विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी आधी शिक्षकांना मानसिक आजाराचे धडे दिले जाणार आहेत.

0
209
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

तंबाखूजन्य पदार्थ, मोबाईल गेम, जंकफूडचं व्यसन, अभ्यासाचं ओझं आणि पालकांच्या अपेक्षा पूर्ण न केल्याची भावना आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचारही वाढत आहेत. त्यामुळे पालिका शाळांमध्ये समुपदेशक नेमले जाणार आहेत. मात्र अशा विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी शिक्षकांना मानसिक आजाराचे धडे दिले जाणार आहेत.

पालिका शाळांमध्ये समुपदेशक नेमावा असा प्रस्ताव नगरसेविका सईदा खान यांनी स्थायी समितीत मांडला होता. या प्रस्तावाला पालिका आयुक्तांना सकारात्मकता दर्शविली होती. त्यानंतर शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी पालिकेच्या शिक्षण समितीला हा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला आता मान्यता मिळाली आहे. त्यानुसार शाळांमध्ये लवकरच समुपदेशक नेण्यात येणार आहे. यासाठी पालिकेनं ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेची मदत घेतली आहे.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेचे संस्थापक डॉ. शिशिर जोशी यांनी सांगितलं की, ‘‘पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार समुपदेशक नियुक्त करण्यात येणार आहेत. पालिका शाळांमधील 3 लाख विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी विद्यार्थ्यांमधील तणाव कसा ओळखावा? आणि मानसिक आजार म्हणजे नेमंक काय? याबाबत शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल. कारण, विद्यार्थ्यांना तणावातून बाहेर काढण्यापूर्वी मानसिक आजार काय आहे याबाबत समाजात जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे.’’

‘‘स्माइलिंग स्कूल कार्यक्रमातंर्गत हा उपक्रम राबवला जातो आहे. त्याद्वारे यंदाच्या वर्षी मुंबईतील पालिकेच्या 150 शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मानसिक आजाराचे धडे दिले जाणार आहेत. 16 सप्टेंबरपासून या प्रशिक्षणाला सुरुवात होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित शाळांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाईल. याशिवाय दर महिन्याला समुपदेशक शाळांमध्ये जाऊन शिक्षकांशी संवाद साधतील. त्यात एखाद्या विद्यार्थ्याला समुपदेशनाची गरज असल्याचं शिक्षकांनी सांगितल्यास त्याचं समुपदेशन केलं जाईल’’, असं डॉ. जोशी यांनी सांगितलं.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेच्या अख्यारित 1,200 शाळा कार्यरत आहेत. पालिका प्रशासन 50-60 मानसोपचार तज्ज्ञ नेमणार आहे. या उपक्रमाद्वारे 3 लाख विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना गरज भासल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेतले जातील.

शिक्षणाधिकारी महेश पालकर म्हणाले की, ‘‘शाळांमध्ये विद्यार्थ्यांना समजवण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचं काम समुपदेशक करणार आहेत. लवकरच या नव्या उपक्रमाला सुरूवात होईल.’’

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here