‘आयुर्वेद आणि अॅलोपॅथीची सांगड घालण्यासाठी क्रॅश कोर्सबाबत विचार सुरू’

रुग्णाला केंद्रबिंदू मानून आयुर्वेद आणि अॅलोपॅथीची सांगड घालणं महत्त्वाचं आहे. यासाठीच इंटीग्रेशनवर आम्ही भर देतोय. दोन्ही डॉक्टरांनी एकत्र काम करावं ही काळाजी गरज आहे. आयुर्वेद आणि अॅलोपॅथीचा एक क्रॅश कोर्स असावा यासंदर्भात विचार सुरू आहे. या दोन भिन्न औषधी विभागांची सांगड घालण्यासाठी सरकारी पातळीवर प्रोजेक्ट आखले जातायत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून आयुर्वेद, योग यांसारख्या गोष्टींवर भर दिला जातोय. अल्टरनेटीव्ह मेडिसिन म्हणून आयुर्वेदाला प्रोत्साहन दिलं जातंय. आयुर्वेद आणि अॅलोपॅथीच्या डॉक्टरांची सांगड, योग-आयुर्वेद शालेय पातळीवर पोहोचवण्यासाठी सरकारची उपाययोजना या अनेक विषयांवर माय मेडिकल मंत्राने केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी चर्चा केली.

माय मेडिकल मंत्रा: आयुर्वेद आणि अॅलोपॅथीची सांगड घालण्याची गरज निर्माण झालीये का?

श्रीपाद नाईक: रुग्ण हा आपला केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कुठल्याही पॅथीचं औषध असू दे. रुग्ण बरा होण्यासाठी जे चांगलं औषध आहे ते आपण त्याला देणार आहोत. या भावनेने दोन्ही भिन्न शाखांचं इंटीग्रेशन महत्त्वाचं आहे. आयुष मंत्रालय यासाठी सर्वतोपरी तयार आहे. सगळे मिळून सर्वांनी एकत्र येऊन रुग्णांसाठी काम करावं ही भावना यामागे आहे.

माय मेडिकल मंत्रा: मॉडर्न मेडिसिन आयुर्वेदाच्या डॉक्टरांना शिकवली पाहिजे असं तुमचं मत आहे. नक्की तुम्हाला काय म्हणायचंय?

श्रीपाद नाईक: होय, हे करण्याची गरज आहे. अॅलोपॅथीतील रुग्णांसाठी चांगल्या गोष्टी या आयुर्वेदीक डॉक्टरांनी का शिकू नयेत. यासाठी एखादा क्रॅश कोर्स किंवा आयुर्वेदाचा काही भाग अॅलोपॅथीत असला पाहिजे, अॅलोपॅथीचे काही भाग आयुर्वेदात असले पाहिजेत या संदर्भात विचार सुरू आहे. मंत्रालयात याबाबत चर्चा केली जातेय आणि येणाऱ्या काळात या गोष्टींचा विचार करून आपण पुढे जाणार आहोत.

माय मेडिकल मंत्रा: आयुर्वेद डॉक्टरांची गेली कित्यक वर्षाची मागणी आहे. अलोपॅथीची प्रॅक्टिस करू देण्याची. याबाबत तुमचं मत काय?

श्रीपाद नाईक: तुम्ही काय शिकलात ते तुम्हाला रुग्णांना देण्याची परवानगी आहे. जे तुम्ही शिकला नाहीत ते तुम्ही कसं देणार. इंटीग्रेशन हा यावर एकमेव उपाय आहे. दोघांनी एकत्र काम केलं तर रुग्णांना फायदा होईल.

माय मेडिकल मंत्रा: हृदयरोग, मधुमेह, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे नॉन कम्युनिकेबल आजार वाढतायत. यावर प्रतिबंध आणण्यासाठी आयुषतर्फे काही उपाययोजना?

श्रीपाद नाईक: नॉन कम्युनिकेबल आजारांवर प्रतिबंध करण्यासाठी आम्ही एक इंटीग्रेटीव्ह प्रोजेक्ट सुरू केलाय. प्रत्येक राज्यातून एक जिल्हा, अशी १० जिल्ह्यांची निवड केलीये. यात आरोग्यमंत्रालय आणि आयुषमंत्रालय एकत्र काम करतील. यात अॅलोपॅथी कायम असेल. काही जिल्ह्यात अॅलोपॅथी-योगा आणि आयुर्वेद, तर दुसऱ्या जिल्ह्यात अॅलोपॅथी-योगा-युनानी अशी सांगड घालण्यात आलीये. संपूर्ण जिल्ह्याचं स्क्रिनिंग होतंय. लोकांना जीवनशैली बदलण्यासाठी करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातंय. यातून आम्हाला आजारांबाबत माहिती मिळेल. पुढील टप्यात देशातील १०० जिल्ह्यात हे प्रोजेक्ट सुरू केले जातील. डेंग्यूबाबत संशोधन सुरू असून आम्ही औषध देणं सुरू केलंय.

माय मेडिकल मंत्रा: सरकारने नॉन ब्रॅन्डेड आयुर्वेदीक औषधांवर जीएसटी कमी केला. पण, ब्रॅन्डेड औषधांवर कर कमी झाला नाही?

श्रीपाद नाईक: याबाबत अर्थमंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. आम्ही आयुर्वेद औषधं कमी किंमतीत देण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी एक प्रपोजल देण्यात आलंय. औषधांवरील जीएसटी पाच टक्यांवर यावा अशी आमची मागणी आहे. यासाठी सरकारी पातळीवर सतत चर्चा केली जातेय.

माय मेडिकल मंत्रा: यावर्षी आपण योग दिवस साजरा केला. योग शाळेच्या मुलांपर्यंत पोहोचावा यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत का?

श्रीपाद नाईक: आम्ही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाचवी इयत्तेपासून शाळेत योग या विषयावर धडा ठेवा अशी विनंती केलीये. त्याचसोबत आयुर्वेदावरही धडा असावा अशीही आमची मागणी आहे. यामुळे लहान वयातच मुलांना योग, आयुर्वेद यांसारख्या गोष्टींची ओळख होईल. ज्याचा मुलांना फायदा होईल. हे विषय आरोग्याशी जोडलेले आहेत, त्यामुळे लोकांना याची ओळख महत्त्वाची आहे.

माय मेडिकल मंत्रा: आयुषविषयी जनजागृती करण्यासाठी मंत्रालयातर्फे काय प्रयत्न केले जातायत?

श्रीपाद नाईक: गेल्या दोन वर्षात आयुर्वेद-योग या विषयावर आपण खूप जनजागृती केलीये. यामुळेच देशातूनच नाही तर परदेशातून आपल्यासोबत करार केले जातायत. आपले शिक्षक दुसऱ्या देशात जाऊन शिक्षण देतायत. दुबई सारख्या राष्ट्रांनी योग हा खेळ म्हणून मान्य केलाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter