राज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्र सरकारने आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्यासाठी ब्रीजकोर्स कायम राहील असा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर राज्यात ब्रीजकोर्ससाठी अर्ज करणाऱ्या डॉक्टरांच्या संख्येत वाढ झालीये. यंदाच्या वर्षी ७०० आयुष डॉक्टरांनी ब्रीजकोर्ससाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाकडे अर्ज केलाय. आयुष डॉक्टरांसाठी हा ब्रीजकोर्स एक वर्षाचा आहे.

0
9244
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • राज्यात अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिससाठी ब्रीजकोर्स करणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढली
  • गेल्यावर्षी ५०० डॉक्टरांनी ब्रीजकोर्ससाठी अर्ज केला होता
  • यंदा ब्रीजकोर्ससाठी अर्ज करणाऱ्या डॉक्टरांची संख्या ७०० वर जाऊन पोहोचलीये
  • आयुष डॉक्टरांसाठी ब्रीजकोर्स हा केंद्र सरकार आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांमधील वादाचा प्रमुख कळीचा मुद्दा आहे

आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिससाठी ब्रीजकोर्स नको, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी दंड ठोपटले. सरकारविरोधात सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला. केंद्राने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातून ब्रीजकोर्सचा मुद्दा काढून टाकला, आणि राज्याला निर्णय घेण्याचे अधिकार दिले. यानंतर महाराष्ट्र सरकारने आयुष डॉक्टरांसाठी ब्रीजकोर्स कायम राहील अशी ठाम भूमिका घेतली.

माय मेडिकल मंत्राला मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात ब्रीजकोर्स सुरू झाल्यापासून अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिससाठी अर्ज करणाऱ्या आयुष डॉक्टरांची संख्या वाढलीये. आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिससाठी ब्रीजकोर्स सुरू करणारं महाराष्ट्र एकमेवं राज्य आहे.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितलं की, ‘‘आयुष डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी राज्य सरकारनं कायम ठेवल्यानं ब्रीजकोर्ससाठी अर्ज करणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढतेय. २०१७-१८ या वर्षात अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळावी यासाठी ब्रीजकोर्ससाठी ५०० आयुष डॉक्टरांनी अर्ज दाखल केला होता. त्यातील ७० टक्के चांगल्या गुणांनी पास झाले. तर २०१८-१९ या वर्षांत अर्ज दाखल करणाऱ्या संख्येत वाढ झाली असून ही संख्या ७०० वर पोहोचली आहे.’’

डॉ. चव्हाण पुढे म्हणाले, “हा ब्रीजकोर्स एक वर्षांचा आहे. यासाठी शिक्षण बोर्डानं अभ्यासक्रम निश्चित केलाय. यात मेडिकल, सर्जरी, स्त्रीरोग आणि फिजिशियन या विषयांचा समावेश आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येतं. जेणेकरून भविष्यात ते आयुर्वेदासह हे डॉक्टर अॅलोपॅथीची प्रॅक्टिस सुद्धा करू शकतील.’’

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचा विरोध झुगारत राज्य सरकारने ब्रीजकोर्स सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पण, सरकारच्या या निर्णयाचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी जोरदार विरोध केलाय.

ब्रीजकोर्सबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी सांगितलं की, गावखेड्यात डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी सरकारनं आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देत ब्रीजकोर्स सुरू केला. पण, या ब्रीजकोर्सला अद्याप न्यायालयानं मान्यता दिलेली नाही. आयुर्वेद डॉक्टरांना अलोपॉथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देणं चुकीचं आहे. वर्षभराच्या अभ्यासानंतर डॉक्टर बनता येत नाही. सरकार रुग्णांच्या जीवाशी खेळतयं.’’

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter