स्वच्छतेबाबत टाटा रुग्णालय पहिल्या तर शताब्दी रुग्णालय दुसऱ्या क्रमांकावर

स्वच्छ भारत अभियानाला अधिक चालना देण्यासाठी मुंबई महापालिकेने देखील पुढाकार घेत पालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षणातंर्गत विविध उपक्रम हाती घेतले. या अंतर्गत एका एनजीओच्या मदतीने पालिका प्रशासनाकडून स्वच्छतेसंदर्भात नुकतचं एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यानुसार मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयाला प्रथम तर कांदिवलीच्या शताब्दी रूग्णालयाला दुसरं पारितोषक मिळालंय.

0
60
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छतेसंदर्भात नुकतचं एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं
  • यामध्ये हॉटेल, शाळा, महाविद्यालय, उद्यान आणि सरकारी तसंच खाजगी रुग्णालयांचा समावेश केला होता
  • स्वच्छतेबाबतेचा पहिला पुरस्कार मुंबईतील टाटा रुग्णालयाला मिळालाय
  • तर दुसरा पुरस्कार पालिकेचं उपनगरी रुग्णालय कांदिवलीच्या शताब्दी रूग्णालयाला मिळाला
  • तिसरा पुरस्कार हा बीकेसीतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटला देण्यात आलाय

याविषयी टाटा रुग्णालयातील वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी एस.एच.जाफरी म्हणाले की, “या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात महिन्याला तीन ते चार हजार रुग्ण येतात. रुग्णांना कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, याकरता आधीपासूनच रुग्णालयात स्वच्छता राखली जाते. रुग्णालयात रूग्ण आणि नातेवाईकांसाठी पोस्टरही लावण्यात आलेत. रुग्णालयातील कॅन्टीनमधली कचऱ्याचंही योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली जाते. रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता असूनही सर्व काम विभागून दिल्यानं योग्य पद्धतीनं होतं. स्वच्छता अभियान आता आलं पण गेल्या अनेक वर्षांपासून टाटा रुग्णालय स्वच्छताबाबत काळजी घेतोय.”

द्वितीय पारितोषिक मिळाल्याबद्दल माय मेडिकल मंत्राशी आपल्या भावना व्यक्त करताना शताब्दी रुग्णालायातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप आंग्रे म्हणाले की, “या संपूर्ण सर्व्हेक्षणात रुग्णालयांत स्वच्छता कशी राखली जाते, कचऱ्याची विल्हेवाट कशापद्धतीनं लावली जाते, याची तपासणी करण्यात आली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली. रुग्णालयांत दररोज साफसफाई केली जाते का? याबाबत विचारणा करण्यात आली. तसंच पुरावा म्हणून रुग्णालयातील फोटो व व्हिडिओ काढण्यात आला. मुंबईतील सर्व रुग्णालयांची माहिती घेतल्यानंतर पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात स्वच्छता उत्तम असल्याबाबत द्वितीय पुरस्कार देण्यात आलाय.”

काही महिन्यापूर्वी पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला होता. यामुळे दोन महिलांना उंदीर चालवण्याची घटनाही घडल्या होत्या. त्यानंतर स्वच्छतेबाबत रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जातं असल्याचा आरोपही केला गेला होता. त्यानंतर याच रुग्णालयाने स्वच्छतेबाबतचा पुरस्कार पटकावला.

याबाबत सांगताना डॉ. आंग्रे म्हणाले की, “रुग्णालयाचा परिसर जंगलाने व्यापलेला असल्याने उंदीर येत होते. परंतु, आता उंदरांना मारण्यासाठी रुग्णालयात पेस्ट कंट्रोल कमिटी स्थापन केलीये. या कमिटीतील कर्मचारी नियमितपणे काम करतात. दर आठवड्याला ही कमिटी आपल्या कामाचा अहवाल सादर करते.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter