डॉक्टर-रुग्णांमधील दुरावा मिटणार

डॉक्टर आणि रुग्णांमधील वाढत चाललेली दरी कमी करण्यासाठी आणि ढासळत असलेला विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. . जुलै 2019 मध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘डिअर पीपल, वुइथ लव्ह अण्ड केअर युवर डॉक्टर्स’ या पुस्तकात हा जाहीरनामा समाविष्ट करण्यात येणार आहे.

0
704
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

डॉक्टर..सामान्यांसाठी डॉक्टर म्हणजे देवदूत..देवानंतर डॉक्टर या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो. पण गेल्या काही वर्षांपासून डॉक्टर आणि रुग्णांमधील तणाव वाढत चाललाय. डॉक्टरांवरील विश्वासाला तडा गेलाय. रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांवर हल्ले होतात. रुग्ण आणि डॉक्टरांमधील ही वाढत चाललेली दरी मिटवण्यासाठी जाहीरनामा बनवण्यात आला आहे.

प्रसिद्ध बेरिअट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर आणि ‘द एस्थेटिक्स क्लिनिक्सचे’ संचालक डॉ. देबराज शोम यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ‘डिअर पीपल, वुइथ लव्ह अण्ड केअर, युवर डॉक्टर्स’ या पुस्तकात हा जाहीरनामा समाविष्ट करण्यात आला आहे. जुलै 2019 मध्ये हे पुस्तक प्रकाशित होईल. तर ‘असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंट्स’ या डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. विपिन चेकर यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.

‘द एस्थेटिक्स क्लिनिक्सचे’ संचालक डॉ. देबराज शोम म्हणाले, ‘‘रुग्णांना डॉक्टरांकडून जशा अपेक्षा असतात, त्याचप्रमाणे डॉक्टरांनाही रुग्णांकडून सहकार्याची अपेक्षा असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून रुग्ण-डॉक्टरांचं तुटत चाललेलं नातं जोडणं हा या जाहीरनाम्याचा मुख्य उद्देश आहे. या जाहीरनाम्यात रुग्ण आणि डॉक्टरांचे हक्क अधोरेखित करण्यात आलेत’’

बेरिअट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर म्हणाल्या, ‘‘डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यात प्रचंड तणाव आहे. डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन मारहाण केली जाते. या दोघांमधील वाढत्या तणावाचं कारणं शोधून त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. या अनुषंगानं रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नातं घट्ट व्हावं, यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे’’

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंट्स या संस्थेचे अध्यक्ष डॉ. विपिन चेकर म्हणाले की, ‘‘रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नाते पूर्वीसारखे करण्यासाठी दोघांमध्ये परस्पर संवाद साधण्याची अत्यंत गरज आहे. यासाठी हा जाहीरनामा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्या पारदर्शक संवाद झाला पाहिजे. तरंच दोघांचा एकमेकांवरील विश्वास वाढेल. असोसिएशनद्वारे आम्ही सर्व खासगी डॉक्टरांना याबाबत जागरूकता निर्माण करणार आहोत. हा जाहीरनामा केवळ खासगी नव्हे तर सरकारी डॉक्टरांनासुद्धा लागू व्हावा, यासाठी लवकरच हा जाहीरनामा राज्य सरकारला सादर केला जाईल’’

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter