…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून

देशात मिळणाऱ्या 732 हर्बल औषधी आणि वस्तूंच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याबाबत तक्रार मिळाल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्र्यांनी राज्यसभेत दिलीये. लोकांची दिशाभूल करणाऱ्या अशा जाहिरातींवर योग्य कारवाई सरकार करत असल्याची माहिती त्यांनी दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • देशात मिळणाऱ्या 732 हर्बल औषधांच्या जाहिराती लोकांची दिशाभूल करणाऱ्या 
  • गेल्या तीन वर्षांत सहा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत केंद्राकडे तक्रार केली
  • दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ आणि चंदीगड या राज्यातून 573 दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत तक्रार 
  • केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद येसो नाईक यांचा राज्यसभेत खुलासा

लोकांचा आयुर्वेदीक आणि हर्बल औषधांकडे कल दिवसेंदिवस वाढतोय. आयुर्वेदीक आणि हर्बल औषधांमुळे साईड इफेक्ट होत नसल्याने लोकं या पर्यायी उपचार पद्धतीकडे वळलेत. पण, याचा फायदा काही औषध उत्पादक कंपन्यांनी घेण्यास सुरुवात केलीये.

आपल्या वस्तूचा खप वाढवण्यासाठी या कंपन्या लोकांची दिशाभूल करू लागल्यात. यासाठी या कंपन्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टीव्ही आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध करतायत. लोकं या जाहिरातींना बळी पडतायत.

राज्यसभेत दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींबाबत माहिती देताना केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद येसो नाईक म्हणाले, “हर्बल औषधांच्या बाबतीत क्लिनिकल ट्रायलची माहिती औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यात देण्यात आलेली नाही. आयुष मंत्रालयाला हर्बल औषधांमुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालीये.”

जाहिरातींवर लक्ष ठेवणारी संस्था अॅडव्हटायझिंग स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रार मिळालेल्या 233 जाहिराती बंद करण्यात आल्यात.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडून लोकं औषधं घेतात. औषधांची विक्री झाल्याने कंपन्यांना याचा फायदा होतो. पण, ही औषधं घेणं लोकांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे लोकांनी जाहिरातींना बळी न पडता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यावीत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter