कॅन्सर- प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आयुर्वेद

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

बदलती जीवनशैली, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता आणि रोगप्रतिकारशक्तीचा अभाव यासह इतर अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून देशात कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. कॅन्सरचं निदान झाल्यावर अनेकजण खचून जातात. पण योग्य उपचारांमुळे कॅन्सरवर मात करता येते. आधुनिक उपचार पद्धतीच्या जोडीने आयुर्वेदिय चिकित्सेच्या माध्यमातून रुग्णांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारणाचं काम भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्राच्या माध्यमातून केलं जातं.

पुण्यातील वाघोलीमध्ये हे संशोधन केंद्र सुरु आहे. १९९४पासून वाघोली आणि सोलापूरमध्ये कॅन्सर संशोधन केंद्राच्या कामाला सुरुवात झालीये. बायोप्सीने कॅन्सरचं निदान निश्चित झाल्यावर रुग्णाचा या प्रकल्पात समावेश केला जातो. आजपर्यंत या प्रकल्पात असंख्य कॅन्सरग्रस्त रुग्णांनी आयुर्वेदिय चिकित्सेचा फायदा घेतला आहे. यामध्ये रूग्णाचं समुपदेशन करण्यासोबत केमोथेरेपी, रेडीओथेरेपी, शस्त्रक्रिया अशा आधुनिक चिकित्सा पध्दतीद्वारे उपचार केले जातात.

शिवाय वाघोलीच्या रुग्णालयात मे २०१०पासून  इंडिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अॅन्ड रिसर्च सेंटर सुरु करण्यात आलंय. टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कॅन्सर रुग्णांसाठी पंचकर्म हॉस्पिटलच्या इमारतीसाठी सहकार्य केलंय.

वाघोलीत कॅन्सर संशोधन प्रकल्पाचे १६० बेडचे सुसज्ज रूग्णालय आणि पंचकर्म केंद्र आहे. या प्रकल्पात रुग्णांना देण्यात येणारी औषधे संस्थेच्याच अथर्व हेल्थकेअर कंपनीत तयार केली जातात. राज्यातील तसेच देशातील रुग्णांना या चिकित्सेला लाभ घेता यावा यासाठी पुण्यातील वाघोलीसह मुंबई सोलापूर, नवी मुंबई, दिल्ली कोल्हापूर व नाशिकमध्ये कॅन्सर संशोधन प्रकल्पाचं काम सुरु आहे. कॅन्सरवरील उपचारांसाठी या केंद्रात देशातूनच नव्हे तर अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांमधून रुग्ण आयुर्वेदिय चिकित्सेबरोबरच पंचकर्म चिकित्सेसाठी येतात.

या आयुर्वेदिक सेंटरचे संचालक डॉ. स. प्र. सरदेशमुख यांच्या सांगण्यानुसार, “आयुर्वेदिय चिकित्सेने कॅन्सर पूर्णपणे बरा होतो असं नाही. पण या चिकित्सेने रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढते आणि आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. रुग्ण त्याचं दैनंदिन कामकाज चांगल्या प्रकारे करु शकतात असं अनेक रुग्णांमध्ये दिसून आलंय. केमोथेरेपी, रेडीओथेरेपीमुळे उदभवणारे त्रास आयुर्वेदिय  चिकित्सेने चांगल्या प्रकारे कमी होतात आणि रुग्ण केमोथेरेपी व रेडीओथेरेपी अपेक्षित कालमर्यादेत पूर्ण करू शकतात.”

या प्रकल्पात बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडीएशन ऑन्कोलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. अरविंद कुलकर्णी, प्रसिध्द कॅन्सर सर्जन डॉ. शिरिष कुमठेकर हे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter