चाळीशीनंतर महिलांना मेनोपॉज तसं पुरुषांना ‘अँड्रोपॉज’

अँड्रोपॉज, पुरुषांमध्ये वाढताना दिसून येणारी ही समस्या आहे. ताणतणाव, व्यायामाचा अभाव यामुळे ही समस्या वाढतेय. यात शरीरातील टेस्टोस्टेरोन कमी होतात. त्यामुळे पुरुषांना अस्वस्थ वाटू लागतं. यावर उपाय म्हणजे योग्य व्यायाम आणि जीवनशैलीत बदल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ज्याप्रमाणे महिलांना रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज येतो, त्याचप्रमाणे पुरुषांदेखील अँड्रोपॉज या समस्येला सामोरं जावं लागतं. अँड्रोपॉज या समस्येमध्ये पुरुषांमध्ये चाळीशीनंतर शरीरातील हार्मोनची पातळी कमी होत जाते.

याविषयी सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश कोठारी सांगतात की, “अँड्रोपॉज ही समस्या पुरुषांमध्ये आढळून येते. महिलांमध्ये येणाऱ्या मेनोपॉजप्रमाणे अँड्रोपॉज ही एक समस्या आहे. अँड्रोपॉज या समस्येमध्ये पुरुषांमधील टेस्टोस्टेरोन कमी होत जाते.”

एच.एल हिरानंदानी रूग्णालयाचे डॉक्टर हरिष शेट्टी सांगतात की, “स्त्रिया मेनेपॉजच्या समस्येविषयी मनमोकळेपणाने बोलतात. मात्र त्याच उलट पुरुषांचं आहे. पुरुष त्यांच्या या समस्येविषयी कोणाशी बोलत नाहीत. हार्मोन्सच्या पातळीमध्ये अचानपणे बदल झाल्यास पुरुषांना अस्वस्थ वाटू लागते. पण अँड्रोपॉज, मेनोपॉजसारखी दिसून येणारी समस्या नाही.”

जसलोक रूग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी म्हणतात की, “अँड्रोपॉज ही आजकाल सामान्य समस्या आहे. शक्यतो अँड्रोपॉज हा चाळीशीनंतरच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. तुमची मनस्थिती ही टेस्टोस्टेरोनवर अवलंबून असते. त्यामुळे जर टेस्टोस्टेरोनची पातळी कमी झाली तर तुमचा मूड बदलतो. तुम्हाला चिडचिडेपणा, ताण-तणाव, चिंता अशा समस्या सतवू लागतात. याचा तुमच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.”

अंड्रोपॉजची लक्षणं प्रत्येक पुरुषांमध्ये विविध असू शकतात.  मात्र काही सामान्यपणे आढळणारी लक्षणं

 • चिडचिडेपणा
 • ताणतणाव
 • चिंता
 • सेक्सची इच्छा कमी होणे
 • थकवा येणे
 • सातत्याने मूड बदलणे
 • राग येणे
 • एकाग्रतेचा अभाव
 • दुःखी होणे

दररोजच्या जीवनशैलीत बदल केल्याने अँड्रोपॉजची समस्या नियंत्रणात राहू शकते. डॉ. समदानी पुढे सांगतात की, “टेस्टोस्टेरोनची पातळी वाढवण्यासाठी लोकांनी त्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे. तसंच जास्त ताण घेणं शक्यतो टाळलं पाहिजे.”

दररोज व्यायाम करा, योग्य तो आहार घ्या, रात्रीची पुरेशी झोप घ्या. यासोबतच समुपदेशनाद्वारे अँड्रोपॉजवर मात करता येऊ शकते.

वच्छन आरोग्य क्लिनिकच्या संचालक अंकिता घाग सांगतात की, “प्रथिनं, पालक, ब्रोकोली, अंड, कोबी, भोपळा, अक्रोड या पदार्थांचं सेवन करावं. या पदार्थांमुळे टेस्टोस्टेरोनची पातळी वाढण्यास मदत होते. तसंच धुम्रपान आणि मद्यपान यांचं सेवनही टाळावं.”

उपाय

 • योग्य आहार
 • व्यायाम
 • रात्रीची पुरेशी झोप
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here