डॉ. अमरापुरकर मृत्यू: ‘मॅनहोल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडलं नाही’

डॉ. दिपक अमरापुरकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर करण्यात आला आहे. ते मॅनहोल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडले नव्हतं, असं अहवालात म्हटलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मुंबईत २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडून मुंबईतील प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ. दिपक अमरापुरकर यांचा दुर्देैवी मृत्यू झाला होता. मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने २१ सप्टेंबरला मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंग यांच्या चौकशी समितीने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालातून डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूला पालिका जबाबदार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

डॉ. अमरापुरकर, शंकर लक्ष्मण मटकर मार्गावरील मॅनहोलमध्ये पडले होते. ते मॅनहोल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडलं नव्हतं, असं या अहवालात म्हटलं आहे. सीसीटीव्ही फूटेज बघितल्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी काही लोकांनी मॅनहोल उघडल्याचं अहवालामध्ये नमूद केलंय. यासंदर्भात आता पुढील चौकशी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करणं अपेक्षित असल्याचंही समितीने म्हटलं आहे.

इतकंच नाहीतर अशी घटना पुन्हा घडू नये याकरता चौकशी समितीने काही सुचनाही केल्या आहेत. यात प्रामुख्याने मॅनहोलच्या झाकणाच्या ५ इंच ते ६ इंच खाली एक जाळीदार झाकण बसवावं असं म्हटलंय. मॅनहोलचे झाकण उघडे राहिले तरी त्यातून पाण्याचा निचरा होईल व जिवीतहानी होणार नाही, यासाठी ही उपाययोजना करण्याचं सांगितलं आहे.

उघड्या मॅनहोलमध्ये कोणीही पडू नये, याकरता प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) व (मलनिसाःरण प्रचालने) यांनी विविध स्त्रोतांकडून प्राप्त सूचनांचा अभ्यास करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

ज्या रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी साचतं अशा रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि पर्यायी सुरक्षित मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यासाठी पोलीस खात्याला विनंती करण्यात यावी, असंही सुचवण्यात आलंय.

याशिवाय ज्या भागातील मॅनहोल उघडली आहेत, त्या परिसरातील लोकांना याबाबत माहिती दिली जावी अशी सूचनाही पालिका प्रशासनाला देण्यात आली आहे.

दरम्यान, अनेकदा हवामान खात्याने वर्तवलेले अंदाज चुकीचे ठरतात. त्यामुळे हवामान खात्याने अचूक अंदाज दिल्यास पालिका प्रशासनाला योग्य ती पूर्वतयारी करता येईल. जेणेकरून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील, अशी सूचनाही समितीने हवामान खात्याला दिल्या आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter