वाढतं प्रदूषण किडनीविकारास कारणीभूत

जगभरात सध्या वाढतं प्रदूषण हा चिंतेचा विषय बनलाय. प्रदूषणाचा फटका लहान मुलांच्या मेंदूला बसतोय. प्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर होतोय. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार वाढलेत. शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार, हवेतील प्रदूषणामुळे किडनीचे आजारही होण्याची शक्यता आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

शास्त्रज्ञांनी केलेल्या तपसाणीतून हवेतील प्रदूषण आणि किडनीचे आजार यांमध्ये संबंध आढळून आलाय. नासा आणि पर्यावरण संरक्षण संस्थेकडून हवेतील प्रदूषणाची माहिती घेतली असता, हवेत पार्टीकल्स मॅटर (कण आणि द्रव यांचं हवेत मिश्रण असणं. जसं की, धूळ, धूर, परागकण) याचं प्रमाण वाढलंय. हे कण श्वासावाटे शरीरात जातात आणि याचा थेट परिणाम किडनीच्या कार्यावर होतो.

अमेरिकन जर्नल ऑफ नेफ्रॉलॉजी, म्हणजेच अमेरिकेतील किडनीविकाराबाबत माहिती देणाऱ्या जर्नलमध्ये हे संशोधन छापण्यात आलंय.

हवेतील हे कण (पार्टीकल्स मॅटर) फार सूक्ष्म असल्याने सहजरीत्या शरीरात जाऊन रक्तात मिसळतात. यामुळे इतरही अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. यापूर्वी केलेल्या अभ्यासांनुसार, हवेतील प्रदूषणामुळे हृदयासंबंधीचे आजार तसंच स्ट्रोकसारखे आजार होतात अशी माहिती पुढे आली होती.

शास्त्रज्ञांनी केलेल्या तपासणीतून असं समजलं की, सध्या हवेत शरीराला हानिकारक ठरेल अशा प्रदूषणात वाढ झालीये. यामुळे अमेरिकेत जवळपास ४४,७९३ इतक्या व्यक्तींना किडनीच्या आजारांना सामोरं जावं लागलंय. यापैकी २,४३८ व्यक्तींना शेवटच्या टप्प्यातील किडनीचा आजार असल्याचं निदान झालंय.

सेंट लुईसच्या वॉशिंगटन विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. झियाद यांच्या सांगण्यानुसार, “मधुमेह आणि हायपरटेन्शन यामुळे किडनीचे आजार संभवू शकतात. मात्र, हवेतील प्रदूषण हा देखील किडनीचे आजार बळावण्यामागचा एक प्रमुख घटक आहे. यामुळे किडनीच्या आजारात वाढ होताना दिसतेय.”

सोर्स- द न्यू यॉर्क टाईम्स

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter