अवयवदान – “जीवनदान हेच सर्वात मोठं समाधान”

अवयवदानासारख्या मोलाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतात ते अवयव प्रत्यारोपण समन्वयक. अवयवदानासाठी ब्रेनडेड रुग्णाच्या कुुटुंबाचं समुपदेशन करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असतं. असंच आव्हान पेलणारी माय मेडिकल मंत्राची आजची आरोग्यदायिनी आहे, नागपूरच्या डॉ. अश्विनी चौधरी

0
444
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

“अनेक रात्र जागून काढल्यात…रात्री-अपरात्री कधीही फोन आला तरी रुग्णालय गाठायचं इतकंच मनात असतं…कामाचा मोबदला मिळतो म्हणून नाही तर आपण केलेल्या कामाने इतरांना जीवनदान मिळतं म्हणून काम करते आणि करत रहाणार…रात्रीच्या झोपेपेक्षा इतरांना जीवनदान मिळणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे…आणि त्यानेच मला समाधान मिळतं”

डॉ. अश्विनी चौधरी, प्रत्यारोपण समन्वयक

अवयवदानासारखा मोठा निर्णय घेणं खूप मोलाचं आणि मोठं काम आहे. मात्र त्याचप्रमाणे महत्त्वाचं आहे ते अवयवदात्या कुटुंबियांचं समुपदेशन करणं. अवयवदानाच्या प्रक्रियेत सर्वात मुख्य आणि पडद्यामागे असणारी व्यक्ती म्हणजे ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर… त्यापैकी एक आहेत त्या डॉ. अश्विनी चौधरी… गेल्या 2 वर्षांपासून नागपूरच्या न्यू-एरा रुग्णालयात दिवसरात्र एक करून काम करत आहेत.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना डॉ. अश्विनी चौधरी म्हणाल्या, “मी स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे वैद्यकीय ज्ञान बरंच आहे. न्यू-एरा रुग्णालय सुरू झालं तेव्हापासून मी इथे कार्यरत आहे. याच रुग्णालयात वेगळं काहीतरी करायची इच्छा होती आणि प्रत्यारोपण समन्वयकाची संधी माझ्यासाठी चालून आली. त्यानंतर याबाबतची ट्रेनिंग घेऊन मी काम करायला सुरुवात केली.”

प्रत्यारोपण समन्वयक म्हटलं की त्यांच्यामागे कामाचा ढिगारा असतोच. मात्र या सर्व कामांमध्ये ब्रेनडेड रुग्णाच्या कुटुंबियांचं समुपदेशन करणं फार आव्हानात्मक काम असल्याचं डॉ. अश्विनी यांचं म्हणणं आहे.

डॉ. अश्विनी यांच्या सांगण्यानुसार, “ब्रेनडेड रुग्णाच्या कुटुंबियाचं समुपदेशन करायचं म्हटलं की मनात एक वेगळी धाकधूक निर्माण होते. समोरचा व्यक्ती आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद देईलच असं नाही. अनेकदा समोरचा व्यक्ती मला मारायलाही धावेल अशीही शंका मनात येते. त्यामुळे या प्रकरणांना योग्य पद्धतीने हाताळणं फार गरजेचं असतं. त्यांची मानसिक स्थिती ओळखून मग समुपदेशन करण्यात येतं.”

डॉ. अश्विनी स्वतः एमडी डॉक्टर असल्याने याचा समुपदेशनासाठी त्यांना अधिक फायदा होतो. याविषयी डॉ. अश्विनी सांगतात, “कुटुंबियांचं समुपदेशन हे कठीण कामच आहे. पण अनेकदा अवयवदानासंदर्भात लोकांना अनेक प्रश्न असतात. ही प्रक्रिया काय?, कशी होते? हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे अशा वेळेला मी स्वतः डॉक्टर असल्याचा मला फार फायदा होतो. कारण त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी त्यांना ठोस आणि शास्त्रीय उत्तर देऊ शकते.”

समुपदेशन करताना कुटुंबाप्रमाणे आपलं मनही अनकेदा खंबीर करावं लागतं. तर कित्येकदा भावना बाजूला ठेवून केवळ डोक्याने काम करणं आवश्यक असतं.

डॉ. अश्विनी यांच्या सांगण्यानुसार, “समुपदेशन करण्यापूर्वी आपलं मन खंबीर आणि डोकं शांत ठेवून काम करावं लागतं. याशिवाय कुटुंबियांचं समुपदेशन केल्यानंतर नातेवाईकांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होणार हे आम्ही गृहितच धरलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक नातेवाईकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याची आम्ही तयारी केलेली असते. मात्र गेल्या दोन वर्षांत प्रामुख्याने लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लोकं अवयवदानासाठी अधिक पुढाकार घेतात.”

गेल्या दोन वर्षांत जवळपास 40 जणांचं डॉ. अश्विनी यांनी समुपदेशन केलं आहे. मात्र प्रौढ रुग्णाच्या कुटुंबियांना समुपदेशन करण्यापेक्षा लहान रूग्णांच्या कुटुंबियांना समुपदेशन करणं कठीण असतं.

डॉ. अश्विनी म्हणाल्या, “एप्रिल 2018 मध्ये आमच्याकडे एक प्रकरण आलं होतं. अवघ्या सहा वर्षांच्या मुलीचा अपघात झाला होता आणि तिची परिस्थिती देखील फार गंभीर होती. डॉक्टर म्हणून आम्हाला सर्वांना खंबीर रहावं लागतं हे खरं आहे. मात्र जेव्हा आम्ही त्या चिमुकल्या मुलीला पाहिलं तेव्हा माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांच्या अंगावर शहारे आले. त्यावेळी माझे देखील डोळे पाणावले होते. अशा परिस्थितीत तिच्या वडिलांना अवयवदानाबाबत समुपदेशन करणं माझ्यासाठी फार कठीण होतं. तो प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही.”

गेल्या दोन वर्षांमध्ये डॉ. अश्विनी यांना अनेक अनुभव आले. प्रत्येक अनुभव हा वेगळा असून त्यातून काहीतरी नवीन शिकायचं असतं असं डॉ. अश्विनी यांचं मत आहे.

त्यांच्या या अनुभवाविषयी बोलताना डॉ. अश्विनी यांनी सांगितलं की, “ब्रेनडेड रूग्णाच्या नातेवाईकांचं समुपदेशन हे त्यांना समोर बसवून शांतपणे केलं जातं. मात्र मी रात्रीच्या वेळेस एकदा फोनवरून देखील नातेवाईकांचं समुपदेशन केलं आहे. रात्रीची वेळ असल्याने मला रुग्णालयात पोहोचणं शक्य नव्हतं. त्यावेळी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार मी त्या रुग्णांच्या कुटुंबियांना फोन केला. अवयवदानाची सर्व प्रक्रिया सांगितली, त्यांचे काही प्रश्न होते ते देखील सोडवले. अखेर त्यांनी अवयवदानासाठी होकार दिला. त्यावेळी हा एक वेगळा अनुभव मला खूप काही शिकवून गेला.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here