गडचिरोली- तब्बल 80 टक्के मुलांना तंबाखूचं व्यसन

गडचिरोलीत 1017 मुलांमध्ये तोंडाच्या कॅन्सरपूर्वीची लक्षणं आढळून आलीयेत. नागपूरच्या सरकारी दंत महाविद्यालयाने गडचिरोलीच्या शाळांमध्ये सर्व्हेक्षण केलं होतं. या सर्व्हेक्षणामधून ही धक्कादायक गोष्ट समोर आलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • गडचिरोलीत 1017 मुलांमध्ये आढळली कॅन्सरपूर्वीची लक्षणं
  • 80 टक्के मुलांना तंबाखूचं व्यसन, 15 टक्के मुलांमध्ये कॅन्सरपूर्वीची लक्षणं
  • नागपूरच्या सरकारी दंत महाविद्यालयाने केलं 41 शाळांचं सर्व्हेक्षण
  • 7,598 मुलांच्या तोंडाची केली तपासणी

नागपूरच्या सरकारी दंत महाविद्यालयाच्या सर्व्हेक्षणात पुढे आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. या माहितीवरून स्पष्ट आहे की अल्पवयीन मुलांमध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. खासकरून गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल भागात 80 टक्के मुलं तंबाखूच्या विळख्यात सापडलीयेत.

याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना नागपूर सरकारी दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी सांगितलं की, “तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने तोंडाचा कर्करोग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात कॅन्सरबाबत जागरूकता नाही. त्यामुळे आम्ही तपासणी अभियान सुरू केलंय. गडचिरोलीत 32 शासकीय आश्रम शाळा आणि वसतीगृह आहेत. शाळेतील मुलांचं सर्वेक्षण केल्यावर असं लक्षात आलं की, 80 टक्के मुलं तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात. यातील 15 टक्के मुलांमध्ये कॅन्सरपूर्वीची लक्षणं आढळून आलीयेत.”  

डॉ. गणवीर पुढे म्हणाल्या की, “तोंडाच्या कर्करोगाची लक्षणं वेदनाविरहित असल्याने रुग्ण याकडे दुर्लक्ष करतात. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू तोंडाच्या कर्करोगामुळे होतात. या मुलांवर आम्ही सद्य स्थितीला उपचार करतो. धक्कादायक बाब म्हणजे या मुलांच्या तोंडात मोठ-मोठे चट्टे पाहून आम्हाला धक्काच बसला.’’

भारतात सिगारेट आणि तंबाखू खाण्याचं प्रमाण जरी कमी होत असलं, तरी शाळा-कॉलेजात जाणाऱ्या अल्पवयीन मुलांमध्ये तंबाखू सेवनाच्या प्रमाणात वाढ झालीये. काही दिवसांपूर्वी केंद्राने केलेल्या सर्व्हेक्षणात अल्पवयीन मुलांमध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण 2.9 टक्क्यांवरून, 5.1 टक्क्यांनी वाढलं असल्याची माहिती समोर आली होती.

नागपूर सरकारी दंत महाविद्यालयाकडून गडचिरोलीत तपासणीसाठी सात जणांची टीम पाठवण्यात आलीये. डॉक्टरांची ही टीम प्रत्येक शाळेत जाऊन मुलांची तपासणी करतेय.

डॉ. गणवीर पुढे म्हणतात, “ज्या मुलांमध्ये कॅन्सरची लक्षणं आढळून आलीयेत त्यांच्यावर तातडीने उपचार केले जाणारेत. शिवाय काही मुलांच्या तोंडातीस चट्ट्यांवरील उपचारांसाठी लेझरचा वापरही करण्यात येणारे. केंद्रीय आदिवासी विभागाने या सर्वेक्षणासाठी 81 लाख रुपये निधी मंजूर केलाय.”

महाराष्ट्राचा गडचिरोली हा आदिवासी आणि दुर्गम भाग म्हणून मानला जातो. या भागात डॉ. सतीश गोगुलवार गेली 30 वर्ष ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या कार्यक्रमांतर्गत अविरत आदिवासींना आरोग्याच्या सेवा पुरवण्याचं काम करतायत. माय मेडिकल मंत्राशी बोलताना डॉ. सतीश गोगुलवार म्हणाले, “या परिसरातील लोकांना तंबाखू खाण्याची सवय असल्याने, लहान मुलंही व्यसनाच्या आहारी जाऊ लागलीयेत. तंबाखू, गुटखा आणि खर्रा या पदार्थांचं सेवन शालेय मुलांमध्ये प्रचंड वाढलंय. तंबाखूमुळे कॅन्सर होतो याची जागरूकता नसल्याने तोंडाच्या कर्करोगाचं वेळीच निदान होत नाही. यासंदर्भात आम्ही शाळांसोबत मिळून जागरूकता निर्माण करण्याचं काम करतोय. पण 15 टक्के शालेय मुलांमध्ये कमी वयात मुखपूर्व कर्करोगाची लक्षण आढळून येणं हे फारच गंभीर बाब आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter