74व्या वर्षी जुळ्यांना जन्म… सत्तरीतील प्रसूती योग्य?

आंध्र प्रदेशमधल्या 74 वर्षांच्या महिलेने जुळ्यांना जन्म दिला आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे त्यांचं आई होण्याचं स्वप्न साकार झालं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

तब्बल 50 दशकांनंतर तिचं आई होण्याचं स्वप्न साकार झालं…एका बाळासाठी ती आसुसली होती…मात्र 74 व्या वर्षी तिने जुळ्यांना जन्म दिला आणि इतक्या जास्त वयात जुळ्यांना जन्म देण्याचा विक्रम केला. वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे सत्तरीत तिला आई होण्याचा आनंद तर मिळाला मात्र तरी तंत्रज्ञानामुळे काही शक्य असलं तरी इतक्या जास्त वयात प्रसूती आई आणि बाळासाठी योग्य नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

आंध्र प्रदेशमधल्या 74 वर्षांच्या मंगायम्मा… त्यांना मूल होत नव्हतं… त्या ज्या परिसरात राहतात तिथल्या एका 55 वर्षीय महिलेला आयव्हीएफमुळे बाळ झालं, त्यानंतर आपल्याला असं बाळ होईल, अशी आशा मंगायम्मा यांच्यामध्येही पल्लवित झाली. त्यामुळे त्यांनीही आयव्हीएफ करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली.

यानंतर गुंटुरमधल्या एका खासगी रुग्णालयात गुरुवारी मंगायम्मा यांनी जुळ्यांना जन्म दिला. हा जागतिक विक्रम असावा असा तिची प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांचा अंदाज आहे. तंत्रज्ञानामुळे इतक्या वयातही अनपेक्षित असा निकाल मिळाला मात्र डॉक्टरांनीदेखील स्वत:वर काही मर्यादा घालायला हव्यात, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

संक्कायल्ला अरुणा ज्यांच्या मार्गदर्शनात या महिलेची सिझिरियन प्रसूती झाली आहे, एका वृत्तसंस्थेची बोलताना त्यांनी महिला आणि दोन्ही बाळांची प्रकृती स्थिर आहे, तिघंही सुखरूप असल्याचं सांगितलं.

FOGSIच्या अध्यक्षा आणि IVF तज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या, “वयाच्या 74 व्या वर्षी गरोदर राहणं हे योग्य नाही. तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे कोणतेही डॉक्टर अशी प्रसूती करू शकतात, तंत्रज्ञान कठीण नाही. मात्र तरी सर्वच डॉक्टर जास्त वयात गरोदर राहिलेल्या महिलांची प्रकरणं हाताळत नाही. तंत्रज्ञानावर बंदी घालू शकत नाही, त्यामुळे डॉक्टरांनी स्वत:साठीच काहीच नियम बनवणं खूप महत्त्वाचं आहे”

मुलाचा जन्म एक बाजू झाली. मात्र दुसऱ्या बाजूला त्या मुलाचं पालनपोषणही तितकंच महत्त्वाचं आहे. 20 ते 24 हे गरोदरपणाचं योग्य वय आहे. मात्र वयाच्या 74व्या वर्षी गरोदर राहणं म्हणजे मुलांच्या पालनपोषणात अडथळे येतात.

पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉ. रमेश भोसले म्हणाले, “तंत्रज्ञानामुळे काय शक्य होऊ शकतो, याचं एक उदाहरण आहे. हे प्रकरण विशेष म्हणावं लागेल. अशा प्रकरणांमध्ये आरोग्यासंबंधी अनेक धोके असतात आणि ते वैद्यकीयदृष्ट्या नीट हाताळली गेली पाहिजेत. मुलांची काळजी घेण्यासाठी एक चांगला आधार हवा असतो, समुपदेशन गरजेचं असतं. मुलांचं पालनपोषण नीट व्हायला हवं. मात्र वैद्यकीय मार्गदर्शक तत्वाचा विचार करता महिलेने योग्य वयातच गरोदर राहायला हवं”

2017च्या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) बिलामध्ये महिलांच्या वयाची मर्यादा 45 आणि पुरुषांच्या वयाची मर्यादा 50 देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, जास्त वयाच्या महिलांनावरदेखील एआरटी तंत्रज्ञानाचा वापर कधी करावा आणि कधी नाही हेदेखील नमूद करायला हवं. तसंच सरकारनं याबाबत डॉक्टरांसाठीदेखील बंधनकारक अशी मार्गदर्शक तत्वं लागू करायला हवीत, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मुंबईतील IVF तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश पाय म्हणाले, “अशी प्रकरणं हाताळणं हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. अशा डॉक्टरांचं समपुदेशन करायला हवं आणि अशी धोकादायक प्रकरणं हाताळल्याबद्दल जबाबदार धरायला हवं. सरकारची मार्गदर्शक तत्वं अशा जास्त वयातील गरोदरपणाला मान्यता देत नाही. डॉक्टरांनादेखील हे बंधनकारक करायला हवं. आता या बाळांकडे कोण पाहणार हा प्रश्न आहेच”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter