मुंबई: महिन्याभरात ३ चिमुरड्यांवर यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

२० ऑगस्ट ते २० सप्टेंबर या महिन्याभराच्या अवधीमध्ये मुंबईत ३ चिमुरड्यांवर यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हे अवयवदानासंदर्भात जागृती वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

0
220
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अवयवदानाचं महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी अनेक जनजागृती मोहीम राबवण्यात येतात. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम हळूहळू पाहायला मिळतोय. प्रौढांच्या अवयवदानासोबत लहानग्यांच्या अवयवदानासंबंधीही जागृती होताना पाहायला मिळतेय. याचंच एक उदाहरण म्हणजे, २० ऑगस्ट ते २० सप्टेंबर या महिन्याभराच्या अवधीमध्ये मुंबईत ३ चिमुरड्यांवर यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

२० ऑगस्टला १३ वर्षांच्या सुहानावर, १३ सप्टेंबरला ४ वर्षांच्या आराध्यावर तर, २० सप्टेंबरला ८ वर्षांच्या कृष्णावर यशस्वीरित्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्यात.

“२०१५ पासून लहान मुलांच्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना सुरुवात झाली. याचवर्षी सगळ्यात जास्त लहान मुलांच्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यात. आतापर्यंत ३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत,” अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती मुंबईच्या समन्वयक उर्मिला महाजन यांनी दिली.

“दोन वर्षांपूर्वी हृदय प्रत्यारोपणासाठी चेन्नईला जावं लागत होतं. पण आता चित्र बदलंलय. महिन्याभरात आम्ही ३ लहान मुलांवर यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. अवयवदानासंबंधी जागृती वाढल्यानं हे शक्य झालंय,” असं मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयातील बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती गारेकर यांनी सांगितलं. तसंच प्रत्येक रुग्णासंबंधी मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आणि शस्त्रक्रियेसाठी निधीही उभारला जातो. यामुळे अवयवदानासंबंधी जागृती वाढत असल्याचं दिसतंय,” असंही त्यांनी सांगितलं.

संपूर्ण जगात होणाऱ्या अवयवदानाच्या टक्केवारीत लहान मुलांवर होणाऱ्या हृदय प्रत्यारोपणाचं प्रमाण फक्त १२ टक्के आहे. ही शस्त्रक्रिया जोखमीची आणि गुंतागुंतीची असल्यामुळे हे प्रमाण कमी असल्याचं डॉ. स्वाती गारेकर यांनी सांगितलं.

यासंदर्भात बोलताना पी.डी. हिंदुजा, फोर्टिस आणि इतर रूग्णालयांत बाल-हृदयरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ. क्षितीज सेठ म्हणाले की, “हल्ली बाल हृदयरोगतज्ज्ञांचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळेच महिन्याभराच्याच अवधीमध्ये ३ शस्त्रक्रिया करणं शक्य झालं. लहानपणीच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणं जास्त हितकारक असतं, कारणं प्रौढांपेक्षा लहानग्यांमध्ये शारीरिक व्याधींचं प्रमाण कमी असतं. पण अवयवदानासंदर्भात आपल्याला अजूनही लांब पल्ला गाठायचा आहे.”

अवयवदानासंदर्भात जागृती वाढत असल्याचं रिजनल ऑर्गन टिश्यू ट्रांसप्लांटेशन ऑर्गनायझेशनमध्ये सामाजिक संस्थांच्या समन्वयक डॉ. कामाक्षी भाटे यांनी सांगितलं. अवयवदानासंदर्भात चौकशी करण्यासाठी लोक पुढे येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter