- महाराष्ट्रातील २९,००० शेतकरी नैराश्याच्या गर्तेत
- १४ जिल्ह्यातील २२,५६५ शेतकऱ्यांनी बाह्यरुग्ण विभागात घेतले उपचार
- तर, ६,३६६ शेतकऱ्यांना करावं लागलं रुग्णालयात दाखल
मानसिक तणावग्रस्त शेतकऱ्यांची ही धक्कादायक आकडेवारी महाराष्ट्र सरकारने विधानपरिषदेत सादर केलीये. नापिकी, कर्जाचं ओझं, हाताला दुसरं काम नाही, जोडधंदा नाही..त्यामुळे हतबल झालेला बळीराजा नैराश्याच्या गर्तेत ओढला जातोय. आणि जगण्यापेक्षा जगाचा हा पोशिंदा मृत्यूला जवळ करतोय.
कुटुंबाचा गाडा हाकता येत न्हाय..कधी अस्मानी तर कधी सूलतानी संकट. जमीनीत काय बी उगत न्हाय. उगलं तर भाव नसल्याने पोटच्या पोराप्रमाणं वाढवलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवावा लागतो. मग जगून तरी काय करायचं..अशा विचारात हा बळीराजा मग आत्महत्या करतोय.
- या वर्षी जून अखेरपर्यंत १३०० शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
- दरदिवशी सात शेतकरी मृत्यूला कवटाळतात
- मराठवाड्यात गेल्या सहा महिन्यात ४७७ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये नैराश्याच्या गर्तेत ओढल्या गेलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने २०१५ साली प्रेरणा अभियान सुरू केलं. या अभियानाच्या माध्यमातून निराश असलेल्या शेतकऱ्यांना वैद्यकीय मदत दिली जाते.
नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरकारने केलेल्या मदतीबाबत विधानपरिषदेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी लेखी उत्तर दिलं.
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत म्हणतात, “प्रेरणा अभियानांतर्गत राज्यातील १४ जिल्ह्यात, एप्रिल २०१६ ते मार्च २०१८ या दोन वर्षात नैराश्यात असलेल्या २९,००० शेतकऱ्यांवर मानसोपचार करण्यात आले. यातील ६,३६६ शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन निराश असलेले शेतकरी शोधून त्यांना उपचार पुरवण्यात आले.”
डॉ. सावंत पुढे म्हणतात, “नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्यांचं शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण करून त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात समुपदेशन किंवा उपचार दिले जातात. १४ जिल्ह्यातील मानसोपचारतज्ज्ञांच्या २४ पदांपैकी १७ पदं भरण्यात आलीयेत.”
शेतकऱ्यांच्या या मानसिक ताणतणावाबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, “सरकारने नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांची माहिती दिली. पण, किती शेतकरी पूर्ण बरे झाले, याची माहिती दिली नाही. किती रुग्णांवर उपचार सुरु असताना त्यांनी आत्महत्या केल्या, याची माहितीही दिलेली नाही.”
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, “प्रेरणा प्रकल्प सुरु झाल्यापासून अर्थसंकल्पात किती तरतूद केली आणि किती खर्च केला? याची आकडेवारी दिलेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे खर्च केलेली तरतूद अतिशय कमी आहे. ४ वर्षात १३ हजार आणि गेल्या वर्षभरात १५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. प्रेरणा प्रकल्प परिणामकारकरित्या राबवला असता तर या आत्महत्या झाल्या नसत्या. म्हणून या संपूर्ण माहितीसह सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशाप्रकारची मागणी मी केली होती व आजही माझी मागणी कायम आहे.”
शेतकऱ्यांच्या नैराश्याचं कारण
- सामाजिक समस्या
- आर्थिक समस्या
- कुटुंबातील तक्रारी
- कर्जबाजारीपणा
- कर्ज न मिळणं
- व्यसन
- इतर आजारांचं टेन्शन
विदर्भ, मराठवाडा, उत्तर-महाराष्ट्रातील हजारो शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. नापिकी, निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करून बळीराजा धान पिकवतोय. पण, पिकलेल्या धानाला, भाजीपाल्याला कवडीमोलाचा भाव मिळाल्याने तो पूर्णत: तुटून जातोय. सरकारकडून मदत मिळत नाही अधिकारी दाद देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यावरचा मानसिक ताण प्रचंड वाढतोय.
सरकारने जाहिर केलेल्या या आकडेवारीवरून स्पष्ट आहे की बळीराजा मानसिक तणावाखाली जगतोय. त्याला आधाराची गरज आहे.