‌तीन ‘पडजीभ’ असणारा मुंबईचा ‘एकजोत’

दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात दोन वर्षांच्या एकजोतवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या तोंडात तीन पडजीभ होत्या. एकजोतचा जबडाही फाटलेला होता. दूध पिणंही शक्य होत नव्हतं. डॉक्टरांनी दोन अतिरिक्त पडजीभ काढून, एक पडजीभ योग्य जागी पुन्हा बसवलीये. त्यामुळे येत्या काही महिन्यात एकजोतला बोलता देखील येईल.

0
143
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

सामान्यत: प्रत्येकाच्या तोंडात एक पडजीभ असते. या पडजीभेचा उपयोग अन्न घशात ढकलण्यासाठी होतो. पण, तुम्हाला सांगितलं की, मुंबईत एक असा मुलगा आहे ज्याला एक नाही, दोन नाही, तीन पडजीभ होत्या तर? तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण, उल्हासनगरच्या एकजोतला पाहून डॉक्टरही चक्रावले होते.

डॉक्टरांच्या मते, तीन पडजीभ असण्याचं प्रकरण फार दुर्मिळ आहे. एक लाख लहान मुलांमध्ये असं एक प्रकरण पाहायला मिळतं.

मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयातील डॉक्टरांनी एकजोतवर शस्त्रक्रिया करून, दोन अतिरिक्त पडजीभ काढून टाकल्यात तर, जागेवर नसलेली एक पडजीभ योग्य ठिकाणी पुन्हा आणलीये.

एकजोतच्या या दुर्मिळ प्रकरणाबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना प्लॉस्टिक सर्जन डॉ. नितीन मोकल म्हणतात की, “एकजोत माझ्याकडे आला तेव्हा त्याचा जबडा फाटलेला होता. घशातील पडजीभ चुकीच्या ठिकाणी होती. या व्यतिरिक्त दोन अन्य पडजीभही होत्या. तो खूपच लहान असल्याने आम्ही तेव्हा शस्त्रक्रिया केली नाही. पण, आता शस्त्रक्रियेने अतिरिक्त दोन पडजीभ काढून टाकण्यात आल्यात. तर, चुकीच्या जागी असलेली पडजीभ योग्य स्थानी आणण्यात आली आहे.”

डॉ. मोकल पुढे म्हणाले की, “जबडा फाटलेला असल्याची बरीच प्रकरणं आहेत. पण, एकजोतचं प्रकरण खूपचं वेगळं होतं. अशी समस्या एक लाख मुलांमध्ये एकातच आढळून येते.”

जन्मत:च जबडा फाटलेला असल्याने एकजोतला दूध पिता येत नव्हतं. तो रडतही नव्हता. माय मेडिकल मंत्राशी बोलताना त्याचे वडील अजित सिंग म्हणाले, “पूर्वी तीन पडजीभ असल्याने त्याला काहीही खाता येत नव्हतं. दूध चमचाने पाजायचो. पण आता तो खाऊ शकतोय. तो सध्या बोलत नाहीये. स्पीच थेरपीने काही महिन्यांतच बोलू लागेल.”

एकजोतच्या या परिस्थितीबाबत बालरोगतज्ञ डॉ. रोहित नार्वेकर म्हणाले की, “लहान मुलांमध्ये जन्मत: दोष निर्माण होणं याची अनेक कारणं आहेत. अनुवंशिकता, गर्भातील बाळाला योग्य पद्धतीने रक्तपुरवठा न होणं, गरोदरपणात आईने काही औषध खाल्ल्याने बाळावर परिणाम होतो. पण तोंडात तीन पडजीभ असणं हे वेगळं प्रकरण आहे.”

नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ज्ञ डी. किशोर यादव म्हणाले, “अनुवांशिकता हे यामागे प्रमुख कारण आहे. अशी प्रकरणं फार पाहायला मिळत नाहीत. पण, योग्य उपचार मिळाल्यास ही मुलं सामान्य मुलासारखं आयुष्य जगू शकतात. बोलू शकतात, खाऊ शकतात. पण, गर्भावस्थेतील स्त्रीयांनी यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter